
सामना ऑनलाईन, नाशिक
सोनई हत्याकांडातील आरोपी पोपट दरंदले याचा मृत्यू झाला आहे. पोपटला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तुरुंगात असताना पोपटला ह्रदयविकाराचा झटका आला होता, ज्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.
नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या बी.एड. महाविद्यालयातील एका सवर्ण मुलीचे मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू (२३) या मुलाशी प्रेमसंबंध होते. हे दोघेही विवाह करतील, असा संशय मुलीच्या कुटुंबीयांना होता. यामुळे त्यांनी सचिनची हत्या करण्याचा कट रचला. स्वच्छतागृहाची टाकी साफ करण्याच्या बहाण्याने विठ्ठलवाडी येथे दरंदले वस्तीवर सचिनला बोलवले. सचिन हा राहुल ऊर्फ तिलक राजू कंडारे (२६) आणि संदीप राजू थनवार (२४) या दोघा मित्रांसह तेथे आला. टाकी स्वच्छतेचे काम सुरू असतानाच या तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. विळा आणि चारा कापण्याच्या अडकित्त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. १ जानेवारी २०१३ रोजी हे हत्याकांड घडले होते. स्वच्छतागृहाच्या टाकीत पडून सचिनचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता.
पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे विहिरीत कूपनलिकेत व स्वच्छतागृहाच्या टाकीत फेकण्यात आले होते. ३ जानेवारीला दरंदलेंच्या विहिरीतून मृतदेहाचे तुकडे पोलिसांनी हस्तगत केले होते. याचवेळी हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडल्याची खात्री पोलिसांना झाली. ५ जानेवारी २०१३ ला याप्रकरणी सातजणांना अटक करण्यात आली होती. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱया या हत्याकांडातील सहा दोषींना जानेवारी महिन्यात नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली होती.


























































