नवरात्र, दिवाळीत देशावर वीजटंचाईचे संकट, 40 टक्के प्रकल्पांमध्ये अतिशय कमी कोळसा शिल्लक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात पुढील काही आठवड्यांमध्ये नवरात्र आणि दिवाळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. या दोन्ही सणांदरम्यान देशात विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र, या महत्त्वाच्या सणांपूर्वी देशावर वीज संकट निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. देशातील 40 टक्के औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा अत्यंत कमी साठा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मोदी सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका करण्यात येत आहे.

केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या आकडेवारीतून देशातील वीज प्रकल्पांमधील कोळशाच्या उपलब्ध साठ्याची माहिती कळते. या आकडेवारीनुसार, देशातील 74 वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा अतिशय कमी साठा शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे. आठवडाभरापूर्वी कमी साठा शिल्लक असलेल्या प्रकल्पांची संख्या 60 होती. आठवडाभरातच अशा प्रकल्पांची संख्या वाढली आहे. सरकारने कोळशा पुरवठ्यावर लक्ष दिले असते तर ही स्थिती निर्माण झाली नसती. गेल्या आठवड्यात देशातील विजेची कमाल मागणी 230 ते 250 गिगावॅटपर्यंत पोहोचली होती. तर मे महिन्यामध्ये हा आकडा 270 गिगावॅट एवढा होता.

कोळशाचा तुटवडा कशामुळे?

‘क्रिसिल’च्या अहवालानुसार, कोळसा तुटवडा लॉजिस्टिक अडचणींमुळे निर्माण झाला आहे. वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाच्या साठ्यातील तुटवडा तात्पुरता आहे. मात्र. एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. परिणामी अनेक भागात उष्णता कायम आहे. त्यामुळे विजेची मागणीदेखील सध्या वाढली आहे. त्यातच नूतनीकरणीय स्रोतांमधून होणाऱया वीज निर्मितीमध्येदेखील उतार चढाव आहे. त्यामुळे औष्णिक वीज निर्मितीवरच मोठा भार कायम आहे.

केवळ तीन दिवस वीजनिर्मितीचा साठा

आकडेवारीनुसार, या 74 प्रकल्पांमध्ये त्यांच्या क्षमतेपेक्षा 35 टक्क्यांपेक्षा कमी कोळसा शिल्लक आहे. केवळ तीन दिवस वीजनिर्मिती करता येईल, एवढाच हा साठा आहे. अनिश्चित मान्सूनमुळे कोळशा पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे केंद्र सरकारने सप्टेंबरच्या सुरुवातीला सांगितले होते. मात्र, पूर्वकल्पना असूनही वेळेत पुरवठा वाढवण्यात सरकारला अपयश आले आहे.