प्रभादेवीच्या गॅमन हाऊसला भीषण आग, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडुपच्या ड्रीम्स मॉलला लागलेली आग विझली नसतानाच प्रभादेवी येथील गॅमन हाऊसच्या बेसमेंटमधील गोडाऊनमध्ये पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले.

प्रभादेवी येथील वीर सावरकर रोडवरील गॅमन हाऊसच्या बेसमेंटमध्ये पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आवश्यक साधनसामग्रीसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचे जवान हरीचंद्र वाडेकर (55) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. तर अभिजित तांडेल (49) यांना दादर येथील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या गोडाऊनमध्ये इलेक्ट्रिक वायरचा साठा होता. त्यामुळे आग काही वेळातच भडकत गेल्याने आग लेव्हल – 3ची असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी 8 फायर इंजिन, 5 जंबो वॉटर टँकर आदी सामग्रीच्या सहाय्याने सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आग पूर्णपणे विझली. दरम्यान, कुर्ला पश्चिम अब्दुल सत्तार चाळीतील एका घरात आज सकाळी आग लागली होती. मात्र स्थानिक रहिवाशांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले.