
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदेला तत्काळ अटक करून त्यांना मोक्का लावा, अशी मागणी शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे केली आहे. आज शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदनही दिले. पूर्णेकर यांच्या हत्येचा खटला जलदगतीने चालवून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशीदेखील मागणी करण्यात आली आहे. एकेकाळी सुसंस्कृत व शांत असलेले ठाणे शहर हे खुनांचे शहर बनले असून, गेल्या आठ महिन्यांत तब्बल 17 जणांची निर्घृण हत्या झाल्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलीस महासंचालकांच्या निदर्शनास आणून दिले.
ठाण्यातील ड्रगमाफिया व बिल्डर लॉबीविरुद्ध लढणारे शिवसेनेचे निष्ठावान प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबर रोजी गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. पूर्णेकर कुटुंबाने मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांनीच हत्येचा कट रचल्याचा आरोप वारंवार केला. एवढेच नव्हे तर, पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांच्या पुरवणी जबाबातदेखील त्यांची नावे घेतली आहेत. तरीही पोलीस यंत्रणेने अद्याप त्यांची साधी चौकशीदेखील केली नाही. आज अखेर शिवसेनेसह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन ठाण्यातील वाढती गुन्हेगारी, ड्रगमाफिया आणि पूर्णेकर यांच्या हत्येसंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, आमदार अॅड. अनिल परब, विधिमंडळातील शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, आमदार अजय चौधरी, वरुण सरदेसाई, महेश सावंत, बाळा नर, मनोज जामसूतकर, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, माजी नगरसेवक हिरा पाटील आदी उपस्थित होते. निवेदनावर शिवसेना ठाणे शहरप्रमुख अनिश गाढवे, मनसेचे अविनाश जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ठाण्यातील हत्यासत्र
17 फेब्रुवारी – मुंब्रा येथे राजू यादव याची गळा चिरून हत्या
12 मार्च – शीळ-डायघर परिसरात वेटर प्रकाश बिस्सा याची हातोडय़ाने वार करून हत्या
25 एप्रिल – नौपाडा येथील हिमा खडका या विवाहितेची गळा दाबून हत्या
15 एप्रिल – मुंब्य्रात आठ वर्षीय चिमुकलीला चाकूने वार करून ठार मारले
5 मे – ठाणे रेल्वे स्टेशन भागात अल्पवयीन मुलाने केलेल्या चाकूहल्ल्यात विशाल पाटेकर या तरुणाचा मृत्यू
16 मे – मुंब्य्रातील अरबाज अली याला ठार मारून त्याचा मृतदेह वसईच्या गटारात फेकला
29 मे – टेम्पोचालक केतन धामणस्कर याची हत्या
10 जून – तुळशीरामनगरमध्ये साहिल पांचाळ या युवकाला चाकूने भोसकले
10 जून – तलावपाळी भागात मुबारक ऊर्फ मुन्ना शेख याची दगडाने ठेचून हत्या
16 जुलै – सावरकरनगर परिसरात पूजा तुपे या विवाहितेचा ओढणीने गळा आवळला
13 जुलै – जुन्या वादातून अमन नावाच्या तरुणाला निर्जनस्थळी नेऊन ठार केले
14 जुलै – संगीता चंदनशिवे या शिक्षिकेला क्रूरपणे ठार मारले
6 सप्टेंबर – कापूरबावडी येथील सार्वजनिक शौचालयात राजू गुजराथी याची हत्या
10 सप्टेंबर – वागळे इस्टेटमध्ये संदीप साळवे यांची जुन्या वादातून हत्या
23 सप्टेंबर – कासारवडवलीमध्ये विवाहितेला ठार मारले
24 सप्टेंबर – पोलीस उपनिरीक्षक किसन भोईर यांची पोखरण रोड येथे निर्घृण हत्या
29 सप्टेंबर – शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळय़ा झाडून हत्या.
मुख्य गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न
पूर्णेकर यांच्या हत्येतील पुरावे नष्ट करण्यासाठी तपास यंत्रणा मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांना वेळ देत असून मुख्य गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पोलीस महासंचालकांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या हत्याकांडामध्ये ड्रग्ज विकणाऱ्या समाजपंटकांचा हात असल्याचा संशयदेखील व्यक्त केला आहे.
गुन्हेगारांचे थैमान
ठाणे शहर शांत व सुसंस्कृत म्हणून ओळखले जायचे; परंतु आता ही ओळख पुसून खुन्यांचे शहर असे म्हटले जात आहे. गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हुक्का पार्लर, रात्रभर चालणारे पब्ज, मसाज पार्लरच्या आडून सुरू असलेले पुंटणखाने, वागळे इस्टेटमधील ड्रग रॅकेट, कोठारी पंपाऊंडमधील गैरधंदे हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असा सवाल करण्यात आला आहे.

























































