Loksabha election 2019 – प्रकाश आंबेडकर एमआयएमसोबतच राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

आगामी निवडणुकीत मतविभाजन टाळून भाजपला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची नेते प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्न पुन्हा एकदा फोल ठरले. त्यामुळे विरोधी पक्षाची महाआघाडी करण्याच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रयत्नांना मोठे अपयश आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विरोधकांच्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दादर पूर्व येथील राजगृहावर गेले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत सुमारे दीड तास चर्चा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांचा या नेत्यांमध्ये समावेश होता. या चर्चेत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत येण्याचा आग्रह धरला. आंबेडकर यांना एमआयएमची साथ सोडण्यासही सांगण्यात आले, परंतु प्रकाश आंबेडकर यांनी ही सूचना धुडकावून लावल्याचे कळते.

या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात होणाऱ्या महाआघाडीसाठी काँग्रेससोबत बैठक झाली असली तरी त्यात कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. आम्ही 12 जागांवर ठाम आहोत, मात्र त्यासाठी काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याने केवळ चर्चा झाली.

एकत्रपणे निवडणुकीला सामोरे

दरम्यान, ही चर्चा सकारात्मक झाली राज्यात महाआघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. लवकरच यावर निर्णय होईल. आम्ही आशावादी आहोत असे छगन भुजबळ म्हणाले. सगळी चर्चा सकारात्मक झाली आहे. काही गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यातून मार्ग निघण्याची आशा आहे. राज्यात एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे अशीच आमची भूमिका असल्याचे माणिकराव ठाकरे म्हणाले.