
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांचा कार्यकाळ येत्या 1 डिसेम्बरला संपत असून त्यांची जागा विद्यमान निवडणूक आयुक्त सुनील अरोरा घेणार आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी अरोरा यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदावरील नियुक्तीला पुष्टी दिली. येत्या 2 डिसेंबरला अरोरा हे नवा पदभार स्वीकारणार आहेत.
अरोरा हे हिंदुस्थानी प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) 1980 च्या तुकडीतील राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. 31 ऑगस्ट 2017 रोजी त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. कायदा मंत्रालयाने सोमवारी अरोरा यांच्या नियुक्तीला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम शिक्कामोर्तबासाठी त्यांच्या नियुक्तीचा आदेश राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आला आहे. अरोरा यांच्या नियुक्तीच्या औपचारिक घोषणेची अधिसूचना लवकर काढण्यात येईल, अशी माहिती मंत्रालयातील सूत्राने दिली.
अरोरा यांच्याकडे प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव
राजस्थानमध्ये प्रशासकीय सेवेत असताना 62 वर्षीय अरोरा यांनी विविध विभागाचे कामकाज पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. त्याचबरोबर अर्थ आणि वस्त्रोद्योग आणि योजना आयोगाच्या विविध पदांवरही त्यांनी काम केले आहे. ते 1993 ते 1998 पर्यंत राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि 2005 ते 2008 पर्यंत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.
























































