
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे अर्थात ईव्हीएमवर देशात विरोधी पक्षांकडून जोरदारपणे आक्षेप घेतला जात असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज ईव्हीएमचे स्पष्ट शब्दांत जोरदार समर्थन केले. देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अपरिहार्य आहे, अशा शब्दांत त्यांनी ईव्हीएमचे जोरदार समर्थन केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज येथे नववा राष्ट्रीय मतदार दिन आयोजित केला होता तेव्हा राष्ट्रपती बोलत होते. आपल्या देशाची भौगोलिक परिस्थिती, विशालता आणि सामाजिक विविधता लक्षात घेऊन देशात यशस्वीपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आधुनिक तंत्रज्ञान अत्यंत उपयोगी ठरत आहे, असेही त्यांनी सांगितले. आपण निवडणूक प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान वापरून इतर देशांपुढे आदर्श ठेवला आहे. त्यामुळे आपल्या निवडणूक पद्धतीचे जगातील अनेक देश अनुकरण करीत आहेत, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.

























































