
अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा महानगरपालिकेतील नोकरीचा राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून मिंधे गटाकडून आयुक्तांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप करतानाच ऋतुजा लटके यांना आपल्या गटात येण्यासाठी मिंधे गटाने मंत्रीपदाचीही ऑफर दिल्याचा गौप्यस्पह्ट शिवसेना विभागप्रमुख, आमदार अॅड. अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मिंधे गटाच्या दबावामुळे राजीनामा मंजूर करण्यास महापालिका आयुक्त जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याने आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे असे सांगतानाच, काहीही झाले तरी अंधेरीची जागा ही शिवसेनेची होती आणि राहील, असा ठाम विश्वास यावेळी परब यांनी व्यक्त केला.
वांद्रे येथील शिवसेना शाखेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला अनिल परब, शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत, विधानसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार रवींद्र वायकर आदी उपस्थित होते. ऋतुजा लटके या मिंधे गटात जाणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्याबाबत बोलताना अनिल परब यांनी सांगितले की, शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. लटके हे एक निष्ठावान शिवसैनिक होते. त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या पत्नी ऋतुजा यांना शिवसेनेने उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. ऋतुजा या महापालिकेमध्ये लिपिक आहेत. राजीनामा देण्यापूर्वी एक महिन्याची नोटीस द्यावी लागते म्हणून गेल्या 2 सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. निवडणुकीनंतर तो मंजूर केला जावा असे त्यांनी त्यात नमूद केले होते. मात्र महिनाभर पालिकेकडून काहीच उत्तर आले नाही. 2 ऑक्टोबरला पालिकेने त्यांना कळवले की, राजीनामा चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला आहे.
3 ऑक्टोबर रोजी ऋतुजा यांनी नव्याने राजीनामा दिला. निवडणूक तोंडावर आल्याने एक महिन्याची नोटीस पूर्ण होत नाही. तरीही काही नियमांनुसार एक महिन्याचा पगार पालिकेच्या कोषागारात देऊन प्रक्रिया केली जाऊ शकते. त्यानुसार ऋतुजा यांनी सर्व प्रक्रिया केली. आवश्यक सर्व कागदपत्रेही त्यांनी दिली. गेले दोन दिवस त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत महापालिकेत ताटकळत ठेवले गेले; परंतु आयुक्तांवर इतका दबाव आहे की, त्यांच्या राजीनाम्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामागची लेखी कारणे आपल्याला सांगावीत अशी मागणी करूनही आयुक्तांनी ती दिली नाहीत, असे अनिल परब यांनी सांगितले.
लटके कुटुंबीय शिवसेनेशी प्रामाणिक
ऋतुजा लटके या शिंदे गटात जाणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे, पण काहीही झाले तरी लटके कुटुंबीय हे शिवसेनेशी प्रामाणिक आहे. विरोधक विनाकारण अफवा पसरवत आहेत. यापूर्वीही वांद्रे येथील वळंजू नावाचा शिवसैनिक समुद्रात बुडणाऱया दोन मुलींना वाचवताना मृत्युमुखी पडला. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी तो भाजपचा कार्यकर्ता होता असा अपप्रचार केला होता; पण वळंजू यांच्या कुटुंबीयांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपले कुटुंब शिवसेनेशी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहील असे सांगितले होते, असे अनिल परब म्हणाले.
आयुक्तांकडे राजीनाम्याची फाईल गेलीच कशी?
ऋतुजा या ‘क’ वर्गातील कर्मचारी असल्याने त्यांचा राजीनामा सहआयुक्त पातळीवरच मंजूर व्हायला हवा असे महापालिकेची नियमावली सांगते. मग त्यांच्या राजीनाम्याची फाइल आयुक्तांकडे कशी गेली आणि सहआयुक्त मिलिंद सावंत हे आयुक्तांनी हिरवा पंदील दिल्यानंतर राजीनामा मंजूर होईल असे कसे सांगू शकतात, असा सवालही यावेळी अनिल परब आणि अरविंद सावंत यांनी केला.
हायकोर्टात धाव
राजीनामा मंजूर केला जात नसल्याने पालिका प्रशासनाविरोधात ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी होणार आहे.
मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीच निष्ठा आहे. त्यामुळे दुसऱया कुठल्याही पक्षाकडून लढण्याचा प्रश्नच येत नाही. मी केवळ ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या ‘मशाल’ चिन्हावरच लढणार असल्याचे ऋतुजा लटके म्हणाल्या.
कोणाचाही दबाव नाही – चहल
लटके यांनी 3 ऑक्टोबरला राजीनामा दिला आहे. या अर्जाला 30 दिवस पूर्ण झालेले नाहीत. त्यांच्या राजीनामा अर्जाबाबतची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. राजीनाम्याबाबत सरकारचा कोणताही दबाव नसल्याचे पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.


























































