
बोपदेव घाट परिसरात नागरिकांची लूटमार करून दहशत माजविणाऱ्या सराईताविरुद्ध एमपीडीएनुसार, एक वर्षाची स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याची मुंबई मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीएनुसार केलेली ही 85वी कारवाई आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यांतर्गत सनी भरत पवार (22, रा. खंडोबानगर, सासवड) असे कारवाई केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने साथीदारांसह सासवड आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चाकू, तलवार या जीवघेण्या हत्यारांसह दरोडा, जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासहित जबरी चोरी करणे, दुखापत करणे, खंडणी, गंभीर दुखापत, चोरी, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध 7 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सराईत सनीविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पाठवला होता. त्याला एक वर्षासाठी मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
आतापर्यंत 85 सराईतांविरुद्ध एमपीडीए कारवाई
शहरातील विविध भागांत दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीएनुसार, स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार मागील दोन वर्षांत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत 85 जणांविरुद्ध कारवाई करून विविध कारागृहांत स्थानबद्ध केले आहे. त्यामुळे स्थानिक परिसरातील शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे.


























































