निवडणूक खर्चासाठी पैसे न दिल्याने भाजप नगरसेविकेकडून सुनेचा छळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणुकीचा खर्च करण्यासाठी पैसे दिले नाहीत तसेच बीएमडब्ल्यू मोटारीसाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी पिंपळे-निलख येथील भाजप नगरसेविकेसह कुटुंबातील चार जणांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरती सुरेश चौंधे (रा. विशालनगर, गणपती मंदिराशेजारी, पिंपळे-निलख) असे सुनेचा छळ करणाऱया भाजप नगरसेविकेचे नाव आहे. सासू आरती चौंधे यांच्यासह विवाहितेचा पती संकेत सुरेश चौंधे, दीर विनय सुरेश चौंधे (सर्व रा. विशालनगर, पिंपळे-निलख) आणि सासूचा भाऊ किशोर निम्हण (सकाळनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुप्रिया संकेत चौंधे (27) हिने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी याबाबत माहिती दिली. आरती चौंधे या 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपळे-निलख प्रभागातून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. आरोपी संकेत आणि सुप्रिया यांचे 19 एप्रिल 2016 रोजी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर 2017 साली झालेल्या महापालिका निवडणूक खर्चासाठी आरती यांनी सुनेकडे पैसे मागितले. याशिवाय तिच्याकडे बीएमडब्ल्यू मोटारीचीही मागणी केली जात होती. मात्र, सून सुप्रिया हिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. तू आमच्या घरामध्ये राहण्याच्या लायकीची नाही, असे म्हणत तिचा वेळोवेळी अपमान केला जाऊ लागला. वारंवार होणाऱया या छळाला कंटाळून अखेर सुप्रियाने सांगवी पोलिसांकडे धाव घेतली.