
प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षामध्ये थांबलेल्या चालकाला अडवून त्याच्यावर लोखंडी हत्याराने वार करणाऱ्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. तर, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
रेहान सिमा शेख उर्फ रेहान दिनेश शेख (वय 19, रा. खोपडेनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, दोन अल्पवयीन ताब्यात आहेत. 14 फेब्रुवारी रोजी रात्री पावणेसातच्या सुमारास कत्रजमधील सच्चाई माता मंदिर परिसरात ही घटना घडली होती. याबाबत 23 वर्षीय रिक्षा चालकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचयातील आहेत. फिर्यादी हे प्रवासी वाहतुकीसाठी याठिकाणी थांबले होते. यावेळी चार दुचाकीवरून 8 ते 10 जण तेथे आले. त्यांनी फिर्यादीला पाहून हाच आहे तो, असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर हातातील लोखंडी हत्यार काढून त्याने फिर्यादीवर हल्ला केला. यात फिर्यादी जखमी झाले आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झाले. या दरम्यान पोलिसांनी तपास करून यातील आरोपी शेख याला त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अभिजीत जाधव, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, राहुल तांबे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.






























































