पुण्यातील नांदोशी येथे उभारणार लता-आशा मंगेशकर नावाने रुग्णालय, धाकटे बंधू पं. हृदयनाथ यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदोशी येथे उभारण्यात येणाऱया लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या रुग्णालयाचे नाव ‘लता मंगेशकर इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ऐवजी आता ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ असे करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळातर्फे घेण्यात आला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी दीनानाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर उपस्थित होते.

ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांना रविवारी (दि. 12) देवाज्ञा झाली. त्या पार्श्वभूमीवर लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळाने कार्यक्रमात काही बदल केले आहेत. 16 एप्रिल सायंकाळी पाच वाजता होणाऱया पूर्वनियोजित कोनशिला समारंभामध्ये ‘संकल्प आणि श्रद्धांजली सभा’ आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंगेशकर आणि भोसले कुटुंबीय या वेळी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी दुपारी चार वाजता सांगीतिक कार्यक्रम होणार असून यामध्ये विभावरी जोशी यांचे गायन होणार आहे. त्यानंतर शंतनू गोखले, अमर ओक, पांडुरंग पवार यांच्या वाद्यसंगीताचे सादरीकरण होणार आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात येणाऱया रुग्णांना उपचारासाठी सध्याची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे फाउंडेशनतर्फे नांदोशी येथे 40 एकर परिसरात रुग्णालय उभारण्यात येत आहे. यामध्ये एक हजार खाटांचे सर्जिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि तितक्याच खाटांचे दुसरे मेडिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. तसेच मंगेशकर कुटुंबाचा संगीत वारसा जतन करणारे संग्रहालय येथे उभारण्यात येणार असल्याचे डॉ. केळकर यांनी सांगितले.

हिंदुस्थान संगीत विश्वातील अजरामर व्यक्तिमत्त्वे असलेल्या लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या नावाला साजेसे भव्य रुग्णालय उभारणे, हीच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल, अशी भावना पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी या वेळी व्यक्त केली.

लता मंगेशकर यांनी वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुरू केले. लता मंगेशकर यांच्या नावाने रुग्णालय असावे यासाठी नांदोशी येथे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशा भोसले यांच्या निधनामुळे आता ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ असे रुग्णालयाचे नामकरण करण्यात आले असून हे रुग्णालय आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय ठरेल. – पं. हृदयनाथ मंगेशकर, अध्यक्ष लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन