पुणे नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात, तीन जण ठार

पुणे नाशिक महामार्गावर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने गाडीतील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज 17 रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास तांबडेमळा ता. आंबेगाव येथे घडली आहे. स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने गाडीही पूर्णपणे जळून खाक झाली असून स्विफ्ट कार चालक जखमी आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा कंटेनर हा बंद अवस्थेत उभा होता. दरम्यानच्या काळात पुण्याहून नाशिककडे जाणारा आयशर टेम्पो डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने आला व प्रथम स्विफ्ट गाडी हिला समोरून धडक दिली. त्यानंतर उभ्या कंटेनर ला जाऊन धडकला. या अपघातात स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या अपघातात स्विफ्ट कार मधील अंकुश उर्फ अनिकेत ज्ञानेश्वर भांबुरे (32), वीरेंद्र विजय कदम (दोघेही रा. खेड ता. खेड), रोहिदास लक्ष्मण राक्षे (रा. राक्षेवाडी ता. खेड) हे मृत झाले असून दत्तात्रय चंद्रकांत गोतारणे (32) रा. राजगुरूनगर ता. खेड जिल्हा पुणे, हा जखमी झाला आहे. घटनेची माहिती कळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस हवालदार राजेंद्र हिले यांनी घटनास्थळी भेट दिली असुन पुढील तपास सुरू आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस जवान नंदकुमार आढारी, संजय नाडेकर, योगेश रोडे संजय नलावडे यांनी प्रयत्न केले. अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका चालक स्वप्निल मोरे, गौरव बारणे, अमित काटे, गणेश शिंदे यांनी तात्काळ अपघात ग्रस्तांना मदत केली.