
पुण्यातील वारजे भागात दहशतीसाठी पिस्तुलातून गोळीबार करणारा सराईत कार्तिक इंगवले याच्यासह तीन साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर रितेश कुमार यांनी केलेली ही सहावी मोक्का कारवाई आहे.
कार्तिक संजय इंगवले (वय 20), सनी बाळू शिंदे (वय 21), वैभव दत्तात्रय भाग्यवंत (वय 24, तिघे रा. रामनगर, वारजे) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. इंगवलेने 16 डिसेंबर रोजी वारजे भागात एका दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील रोकड लुटली होती. त्यानंतर दहशत माजविण्यासाठी त्याने पिस्तुलातून गोळीबार देखील केला होता. इंगवले याच्या विरोधात लूट, खंडणी, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे इंगवले आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांनी तयार केला. संंबंधित प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहेल शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी देऊन इंगवलेसह साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.





























































