
शहरातील शिवाजीनगर मुख्यालयात असलेल्या सायबर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. एका पोलीस हवालदाराकडून फाईल देणे-घेण्याच्या वादातून सहकाऱ्यास बेदम मारहाण झाली आहे. त्यामुळे मुख्यालयात कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला संबंधित पोलीस हवालदारावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा वरदहस्त आहे. त्यामुळे फाईल देणे-घेण्याच्या वादातून सहकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. कोरोना कालावधीत मागील सहा महिन्यांपासून रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांमुळे अनेक कर्मचारी बाधित झाले आहेत. दुसरीकडे मात्र, सायबर पोलिस ठाण्यात एकमेकांना समजून घेत काम करणे अपेक्षित असताना मुख्यालय आवारात मारहाण करण्यात आली. मारहाण प्रकरण घडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यानी संबंधिताविरुद्ध कारवाई केली नाही. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यानी आश्चर्य व्यक्त केले आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी विभागाकडून माहिती घेऊन दोषींवर कारवाई करू असे सांगितले आहे.



























































