
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद उमटले. या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकत्र्यांनी मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात जोरात निदर्शने केली.
राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशात धक्काबुक्की झाल्याचे वृत्त मुंबईत येऊन थडकताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आदी सहभागी झाले होते.
महिला सुरक्षित नाहीत
उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत. अत्याचार झाल्यावर कोणी विचारणा करण्यास गेल्यावर आडकाठी होते. त्या मुलीवर जीवंतपणी अत्याचार झाला आणि मृत्युंनंतर तिच्या परिवाराला अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. हे सर्व मानवतेच्या नियमांमध्ये कुठेच बसताना दिसत नाही, अशा शब्दात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशातील दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची साधी दखलही घेतलेली नाही. त्यामुळे मोदी आणि योगी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने केली आहे.
दलित अत्याचारांत वाढ; मोदी, योगी यांनी राजीनामा द्यावा!
उत्तर प्रदेशमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना अत्यंत निर्घृण आहे. तरुणीचा मृत्यू झाल्यावर पोलिसांनीही मध्यरात्री तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. हा सगळाच प्रकार अत्यंत संशयास्पद आहे. दलितांवरील अत्याचार थांबले नाहीत तर देशातील मागासवर्गीय आणि सफाई कामगारांना नाईलाजाने रस्त्यावर उतरून काम बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोिंवदभाई परमार यांनी दिला आहे.





























































