राहुल गांधी म्हणतात, काँग्रेसकडे रेल्वेचे तिकीट काढायलाही पैसे नाहीत; मोदी सरकारचा लोकशाहीवर दरोडा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बँक खाती गोठवण्यात आल्याने देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आपल्याच खात्यातील पैशांचा वापर करू शकत नाही. जाहिरातींसाठी, सभांसाठी पैसा नाही. विमाने सोडा… रेल्वेचे तिकीट काढायलाही पैसे नाहीत. अशा स्थितीत निष्पक्ष वातावरणात निवडणुका होतील कशा? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी फक्त आमची बँक खातीच गोठवलेली नाहीत तर देशातील लोकशाहीच गोठवली आहे. लोकशाहीवर अक्षरशः दरोडा घातला आहे, असा घणाघात आज काँग्रेस नेते  राहुल गांधी यांनी भाजपावर केला.

आयकर विवरणपत्रातील तफावत सादर करण्यासाठी महिनाभर उशीर झाला म्हणून आयकर विभागाने काँग्रेसची सर्व बँक खाती गेल्या महिनाभरापासून गोठवली आहेत. ही खाती तत्काळ पूर्ववत सुरू करा, अशी मागणी काँग्रेसने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केली.

लोकसभा निवडणुकीची वेळ गाठूनच काँग्रेसवर ही कारवाई केली गेल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. 1994-95 आणि 2017-18 च्या प्रकरणात काँग्रेसला आता नोटीस बजावून दंड ठोठावण्यात आला. 14 लाख रुपयांचा दंड असताना तब्बल 210 कोटी रुपयांचा दंड ठोठावला गेला, ही कुठली लोकशाही, असा सवाल खरगे यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची बँक खाती गोठवून काँग्रेसला खिळखिळी करण्याचा नरेंद्र मोदींनी पद्धतशीर डाव खेळल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. काँग्रेसला जनतेने दिलेल्या देणग्या भाजपाने लुटल्याचा आरोप काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी केला.