
सामना प्रतिनिधी । राहुरी
राहुरीच्या मुळा डावा कालव्यात कोसळलेला ऊसाचा ट्रक बाहेर काढण्यात आल्याने बंद करण्यात आलेले मुळा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाण्याचे आवर्तन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, एवढी मोठी घटना घडली असतानाही देवळाली प्रवरा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंता व कर्मचारी कुंभकर्णी झोपेत असल्याने या विभागाचा कारभार रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संगमनेर सहकारी साखर कारखान्याचा हा ट्रक येवलेआखाडा येफथील शेतकऱ्याच्या ऊस घेऊन मुळा डावा कालव्याच्या रस्त्याने जात होता. ट्रकमध्ये १४ टन ऊसाचा लोड होता. त्यातच पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने अचानक रस्ता खचल्याने ऊसाचा ट्रक कलंडून मुळा डावा कालव्यात पलटी झाला. पाटाच्या पाण्यात ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळताच येवले आखाडा प्रभागातील नगरसेवक शहाजी जाधव तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रकच्या केबीनमध्ये अडकलेल्या चालकाला सहीसलामत बाहेर काढले.
मुळा डावा कालव्याच्या पाण्यात पलटी झालेला ट्रक बाहेर काढण्यासाठी शहाजी जाधव यांनी घटनास्थळी क्रेनची यंत्रणा पाचारण केली. ३ तासाच्या प्रयत्नानंतर ऊसाचा ट्रक कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. ऊसाचा गळीत हंगाम सुरू असल्याने मुळा कालव्यालगतच्या ऊसाची तोड झाल्यानंतर वाहनांना बाहेर जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था नाही.
मुळा डावा कालव्याच्या रस्त्यावरून ऊसाचे ट्रक नगर मनमाड राज्य मार्गावरून संबंधीत कारखान्याकडे रवाना होत आहेत. मुळा डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे. पाऊस नसल्याने मुळा धरणाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांवर स्थिरावला होता. त्यातच समन्वयी पाणी वाटपाच्या धोरणानुसार यंदा जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याने मुळा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील २ आवर्तन कमी होणार आहेत. पाण्याचे आवर्तन सुरू असताना मुळा पाटबंधारे उपविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्कता बाळगण्याचे आदेश कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी केले आहे. मात्र, आवर्तनाच्या काळात देवळाली प्रवरा उपविभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रामभरोसे कारभार पाहता वरिष्ठ अधिकाऱ्याचे आदेश धाब्यावर बसविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

































































