रायगडाच्या हापूसचा हंगाम लांबणीवर; मोहर उशीरा आल्याचा परिणाम

625

यंदाचा लांबलेला पाऊस आणि थंडीला झालेला उशीर यामुळे आंब्याला मोहर येण्याची प्रक्रीयाही लांबणीवर पडली आहे. उशीरा येत असलेल्या मोहरामुळे फळधारणेला उशीरा सुरुवात होईल. त्यामुळे यंदा रायडच्या हापूस आंब्याची चव उशीरा चाखायला मिळणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांचे उत्पन्नही कमी होण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यात 42 हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. त्यापैकी 14 हजार हेक्टर क्षेत्रावर उत्पादन देणारे आंबा पिक घेतले जाते. यातून जवळपास 21 हजार मेट्रीक टन आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. साधारण 15 नोव्हेंबरपासून आंब्याला मोहर येण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा पावसाचा मुक्काम लांबला. तसेच अजून थंडीही सुरु झालेली नाही. त्यामुळे मोहर उशीरा येत आहे. 15 डिसेंबरनंतर मोहर येण्यास सुरुवात होईल. मोहर उशीरा आल्यामुळे आंबा येण्यासही उशीर होणार आहे. त्यामुळे रायगडातील आंबाही उशीराच बाजारात येणार आहे.

रायगडातील आंबा बाजारात येण्यापूर्वी सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बाजारात आलेला असेल. रायगडचा आंबा बाजारात उशिरा येण्याने रायागडच्या आंब्याला अपेक्षित दर मिळेल की नाही याबाबत साशंकता असेल. योग्य दर मिळाला नाही तर आंबा बागायतदारांचे उप्तन्नही घटण्याची शक्यता आहे. सध्याच्या हवामानात पंधरा दिवसात आंब्याला मोहर येण्यास सुरुवात होणे अपेक्षित आहे. आंबा मोहर संरक्षणाची पूर्वतयारी म्हणून नवीन फुटणाऱ्या पालवीवर शेंडा पोखरणारी आळी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारस केलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

काही दिवसात आंब्याला मोहर येण्यास सुरुवात होईल. विद्यापीठाने शिफारस केलेले मोहर नियंत्रण पद्धती योग्य प्रमाणात योग्य वेळी वापरल्यास आंबा मोहराचे योग्य संरक्षण होऊ नुकसान टाळता येईल. आंबा मोहराचे नुकसान टाळण्यासाठी बागायतदारांनी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी. तांत्रिक सल्ला घेण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन रायगडचे कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके यांनी केले आहे,

आपली प्रतिक्रिया द्या