
सामना प्रतिनिधी । मुंबई
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या चष्म्याचा नंबर वाढला असल्याची कुजबूज पत्रकारांमध्ये आहे. कारण पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना गोयल यांनी ‘महागाई? कुठे आहे महागाई?’ असा प्रतिसवाल केला.
शुक्रवारी भाजपच्या वसंत स्मृती येथील कार्यालयात गोयल यांची पत्रकार परिषद झाली. या वेळी त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा आढावा घेतला, परंतु गेल्या चार वर्षांत महागाई रसातळाला गेल्याचा दावाही केला. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. एकीकडे भाज्यांच्या दरात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर, स्वयंपाकाच्या गॅसचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. उत्पादनाला कवडीमोल भाव मिळतो म्हणून शेतकरी ते उत्पादन रस्त्यावर फेकत आहेत, अशी स्थिती असताना पीयूष गोयल यांनी मात्र पत्रकारांना विचारले, ‘महागाई? कुठे आहे महागाई?’





























































