रेल्वे चालविणार ‘समानता एक्प्रेस’, डॉ. बाबासाहेबांचा जीवनप्रवास उलगडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व याकरिता आयुष्य वेचणारे घटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जन्मतिथी वर्षानिमित्त ‘समानता’ नावाच्या एका पर्यटन एक्स्प्रेसची घोषणा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशीच रेल्वेने करीत त्यांना अभिवादन केले. नुकतीच रेल्वेने ‘रामायण एक्स्प्रेस’ सुरू करून धार्मिक पर्यटनाची सुरुवात केली होती.

‘समानता’ या एक्प्रेसचे संचलन आयआरसीटीसी करणार असून डॉ. बाबासाहेबांचे जन्मस्थान असलेल्या मध्य प्रदेशच्या इंदूर येथील ‘महू’पासून बौद्ध धर्माचा प्रसार झालेल्या बोधगया, सारनाथ, कुशीनगर आणि भगवान गौतम बुद्धांचा जन्म झालेल्या नेपाळच्या लुंबिनीपर्यंत या एक्प्रेसचा प्रवास होणार आहे. त्यामुळे नागपूरपासून एक्प्रेसचा प्रवास सुरू होणार आहे. या ट्रेनचा प्रवास नागपूर-मुंबई(दादर)-इंदूर-गया-गोरखपूर-वाराणसी-नागपूर असा असणार आहे.

11,340 रुपयांचे तिकीट

या टुरिस्ट एक्प्रेसचे तिकीट प्रत्येक प्रवाशामागे 11,340 रुपये इतके असणार आहे. आरआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तसेच प्रवासी आरक्षण केंद्रातूनही एक्प्रेसचे आरक्षण करता येणार आहे. या एक्प्रेसचा प्रवास 12 दिवसांचा असणार असून रेल्वे, रस्तेमार्ग, बसमधून प्रेक्षणीय स्थळांना भेट, धर्मशाळांमध्ये निवास असे ‘समानता एक्स्प्रेस’च्या पर्यटनाचे स्वरूप असणार आहे. लवकरच या एक्प्रेसचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयआरसीटीसीच्या सूत्रांनी दिली.