जेईई मेन परीक्षेत पुण्याचा राज अगरवाल देशात दुसरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नॅशनल टेस्ट एजन्सीने (एनटीए) जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर केला. मध्य प्रदेशमधील भोपाळचा विद्यार्थी ध्रुव अरोराने या परीक्षेत देशात पहिला रँक मिळवला तर महाराष्ट्राच्या राज आर्यन अगरवाल याने दुसरा रँक पटकावला. पहिल्या 15 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेत टॉपर्स ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींपेक्षा मुलांची संख्या अधिक आहे.

बीई आणि बीटेकसह इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशातील 467 केंद्रांवर घेतल्या गेलेल्या या परीक्षेत 8 लाख 74 हजार 469 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यातील 15 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल गुण मिळवले. टॉपर्समध्ये तेलंगणामधील सर्वाधिक चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या 8 ते 12 जानेवारीदरम्यान ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली होती. त्यामुळेच या परीक्षेचा निकालही लवकर लावणे एनटीएला शक्य झाले.

महाराष्ट्रातील राज अगरवाल याच्यासह अंकित कुमार मिश्रा आणि कार्तिकेय गुप्ता या दोघांनी पहिल्या 15 टॉपर्समध्ये स्थान मिळवले. राज अगरवाल हा पुण्यातील महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याचे आठवीपर्यंतचे शिक्षण रशियामध्ये झाले असून नववीपासून तो पुण्यात शिकत आहे. त्याचे वडील खासगी कंपनीमध्ये इंजिनीयर म्हणून कार्यरत आहेत. अंकित याचे आयआयटी मुंबईत कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे लक्ष्य आहे. कार्तिकेय हा पुढच्या जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेचीही जय्यत तयारी करत आहे.

इंजिनीयरिंगच्या कोणत्या अभ्यासक्रमाला जायचे हे त्याने ठरवलेले नाही, पण आयआयटी मुंबईला आपले प्राधान्य राहील असे त्याने सांगितले. अंकित आणि कार्तिकेय हे दोघेही ऍलन करीअर इन्स्टिटय़ूटचे विद्यार्थी आहेत. या इन्स्टिटय़ूटमधील पाच विद्यार्थ्यांनी या परीक्षेत 100 पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत.