
राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच ईडी आणि सीबीआय, आयकरच्या कारवाईमुळे तपास यंत्रणांचा गैरवापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. यातच आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडी) एका अधिकाऱ्याला 15 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
काही दिवसांपूर्वीच ईडीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्याशी संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांची फेरासंदर्भात (एफईआरए) चौकशी केली होती. त्यानंतर राजस्थानमधील एसीबीने ईडीच्या एका अधिकाऱ्याविरोधात कारवाई केली आहे. या अधिकाऱ्याने मध्यस्थांमार्फत 15 लाखांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
ईडीचे अधिकारी नवल किशोर मीना यांनी मध्यस्थामार्फत 15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर राजस्थानमधील एसीबीने मीणा यांना ताब्यात घेतले आहे. एसीबीला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचला आणि मीना यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यानंतर एसीबीने त्यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत एसीबीकडून अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. नवल किशोर मीना ईडीमध्ये अधिकारी आहेत. एका चिटफंडशी संबंधित प्रकरणात फाईल बंद करण्यासाठी आणि संपत्तीवरील जप्ती टाळण्यासाठी त्यांनी मध्यस्थांकडून 15 लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे एसीबीने सांगितले.





























































