कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर करा, राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांमध्ये 84 दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर कमी केले तर लसीकरणाच्या वेगाला गती देता येईल. याबाबत विचार केला जावा अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी सर्व राज्यांचा कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी टोपे यांनी महाराष्ट्रातील लसीकरणाची माहिती त्यांना दिली.

” राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व्यापक प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणाची गती वाढावी यासाठी मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य सारखे अभियान राबविण्यात आले. याचा लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी फायदा झाला. आता लसीकरणाची शिबीरं आणि वेळही वाढवली जात आहे. लसीकरणाच्या मोहिमेत आरोग्य, महसूल, नगरविकास, शिक्षण अशा विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी एकत्रित काम करीत आहेत.’ असे टोपे म्हणाले

लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. यासाठी ओपिनियन लीडर्स, धर्मगुरु यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, असेही टोपे यांनी सांगितले. या आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विविध राज्यांचे आरोग्य मंत्री, आरोग्य विभागाचे सचिव, लसीकरण अधिकारी सहभागी झाले होते.