राजेश्वर उदानी हत्याप्रकरणी मी का घाबरू! देबोलिना भट्टाचर्जी

देबोलिना भट्टाचार्जी

सामना ऑनलाईन, मुंबई

घाटकोपरमधील व्यावसायिक राजेश्वर उदानी यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांचा माजी स्वीय सहाय्यक सचिन पवार याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये ‘गोपी बहू’ची भूमिका साकारणाऱ्या देबोलिना भट्टाचर्जीचे नाव असल्याची चर्चा होती. पोलिसांनी तिला 9 डिसेंबर 2018 रोजी चौकशीसाठीही बोलावले होते. या प्रकरणाबाबत देबोलिनाने पहिल्यांदाच तिची भूमिका जाहीरपणे मांडली आहे. ‘माझी काही चूक नसताना मी का घाबरू’ असा सवाल तिने विचारला आहे.

या प्रकरणातील आरोपी सचिन पवार आणि डेबोलिनाचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. या चर्चेमुळे पोलिसांनी तिलाही चर्चटेसाठी बोलावलं होतं. चर्चेदरम्यान पोलिसांनी मला काहीही त्रास दिला नाही, मात्र माध्यमांनीच खटला चालवण्याची भुमिका घेतल्याने मला बराच मनस्ताप झाला असं देबोलिनाने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. मूळची आसामची रहिवासी असलेली देबोलिना हिने सांगितलं की ‘माझी आणि सचिन पवारची चांगली मैत्री असून आम्ही दोघे आसामला कामाख्या मंदिरात दर्शनासाठीही गेलो होतो. आमची दोघांची ओळख एका प्रचार रॅलीमध्ये झाली होती आणि त्यानंतर आम्ही काही डॉक्युमेंट्रीवर काम करीत होतो.’ राजेश्वर उदानी आणि आपली फक्त तीन वेळा भेट झाली होती आणि त्यांच्याशी ओळख ही त्यांच्या मुलीच्या लग्नात झाल्याचं देबोलिनाने सांगितलं आहे.

सचिन पवारला अटक झाल्यानंतर आपल्याला जबरदस्त धक्का बसल्याचं देबोलिनाने सांगितलं आहे. सचिन पवारसोबत प्रेमसंबंध असल्याच्या चर्चेबाबत बोलताना देबोलिनाने म्हटलं की आम्ही दोघे चांगले मित्र असून प्रेमसंबंधांबाबतच्या चर्चा या अफवा आहे. सचिन पवारला अटक झाल्यानंतर आमची पोलीस स्थानकात भेट झाली होती असं तिने म्हटलंय. या भेटीदरम्यान मी त्याला विचारलं होतं की नेमकं काय झालेलं असंही तिने सांगितलंय. या आरोपांचा आपल्या करिअरवर काहीही परिणाम झाला नसल्याचा दावा देबोलिनाने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या