गेहलोत मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार; पायलट गटाला 5 मंत्रीपदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत कुरबुरी, सचिन पायलट यांची नाराजी या पार्श्वभूमीवर अखेर रविवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले. 11 कॅबिनेट मंत्री आणि 4 राज्यमंत्री असे एकूण 15 मंत्र्यांना राज्यपाल कलराज मिश्रा यांनी मंत्रीपदाची शपथ दिली. पायलट गटाला 5 मंत्रीपदे देण्यात आली. असंतुष्ट आमदारांची नाराजी दूर करण्याच्या हेतूने मंत्रिमंडळाची नवी घडी बसवण्यात आली आहे.

जयपूर येथील राजभवनात रविवारी सायंकाळी 4 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. गेहलोत आणि पायलट गटामध्ये अनेक महिन्यांपासून शीतयुद्ध सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. या फेरबदलातून पायलट गटाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, मुख्यमंत्री गेहलोत यांनी 3 अपक्ष आणि तीन काँग्रेसचे अशा सहा आमदारांना आपले सल्लागार म्हणून नियुक्त करून त्यांची राजकीय सोय लावली आहे.

15 नव्या मंत्र्यांच्या एण्ट्रीमुळे गेहलोत मंत्रिमंडळाचा कमाल 30 मंत्र्यांचा कोटा पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याव्यतिरिक्त 19 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्री असे एकूण 30 जणांचे मंत्रिमंडळ झाले आहे. मंत्रिमंडळात चार दलित आमदार आणि तीन महिलांनाही स्थान दिले आहे. तसेच पायलट गटाच्या 5 आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत.

मंत्रिमंडळातील नवे चेहरे

हेमाराम चौधरी, महेंद्रजीत सिंह मालवीय, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रामलाल जाट, रमेश मीणा, ममता भूपेश बैरवा, भजनलाल जाटव, टीकाराम जुली, गोविंद राम मेघवाल आणि शपुंतला रावत या 11 जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यातील तिघांना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेटवर घेण्यात आले आहे. गेल्या वर्षी बंडखोरीमुळे मंत्रिमंडळातून पत्ता कट झालेल्या दोघांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच जाहिदा खान, बृजेंद्र सिंह ओला, राजेंद्र गुढा, मुरारीलाल मीणा हे राज्यमंत्री बनले आहेत.