
ठाण्यात माझ्या एक तासाच्या भाषणात महिलांबाबत, मातृशक्तीच्या गौरवाबाबत मी भाषण केले. या भाषणात महिलांच्या वस्त्रासंदर्भात एक वक्तव्य मी केले, मात्र त्याचा अर्थ हा माझ्याप्रमाणे साधे वस्त्र असा होता. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो. माध्यमांनी ध चा मा केला, असे कारण देत बाबा रामदेव यांनी अखेर राज्य महिला आयोगाला माफीनामा पाठवला.
पतंजली योगपीठाचे योगगुरू बाबा रामदेव यांनी ठाण्यात महिलांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन केले होते. खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही यावेळी उपस्थित होत्या. यावेळी रामदेव बाबांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले होते, मात्र बाबा रामदेव यांचे वक्तव्य महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा यांना धक्का पोहोचवणारे होते, अशी तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली होती. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने वक्तव्याचा खुलासा करावा, अशी नोटीस बजावली होती. दरम्यान, रामदेव यांचा खुलासा राज्य महिला आयोग कार्यालयाला मिळाला असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.




























































