रमेश कदम यांची निर्दोष सुटका

आर्थर रोड तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱयाला धमकी दिल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्त केले. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी रमेश कदम यांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. गुन्हा नोंदवून 8 वर्षे उलटल्यानंतर न्यायालयाने कदम यांना हा दिलासा दिला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात असताना रमेश कदम यांनी तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांना शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप होता. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, 24 फेब्रुवारी 2016 रोजी तुरुंगातून जे. जे. रुग्णालयात जाण्यासाठी गाडी उपलब्ध केली नाही. या रागातून रमेश कदम यांनी डॉ. घुले यांना धमकावले होते. कदम यांच्याविरुद्ध एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुह्याचा खटला विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे चालला. या प्रकरणात कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी दबावाखाली दोषारोपपत्र दाखल केले, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे अॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी सुनावणीवेळी केला. हा युक्तिवाद तसेच सरकारी पक्षाने सादर केलेल्या सर्व साक्षी-पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय न्यायालयाने शुक्रवारी जाहीर केला. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे दोषत्व सिद्ध करण्यास पुरेसे नसल्याचे नमूद करीत न्यायालयाने रमेश कदम यांची निर्दोष मुक्तता केली.