पाच वर्षाच्या मुलीची बलात्कार करून हत्या, न्यायालयाने दोषी बाबुराव सांगेरावला सुनावली फाशीची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
law

पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी बाबुराव सांगेराव याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने भोकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी 23 मार्च रोजी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. केवळ 60 दिवसात या खटल्याचा निकाल लागला.

भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथील शेतकऱ्यांच्या पाच वर्षीय चिमुकलीवर सालगड्याने 20 जानेवारी 21 रोजी शेताजवळील नदीपात्रात लैंगिक अत्याचार करून खून केल्याची घटना घडली होती. या अमानूष अत्याचाराचा सर्व स्थरातून तीव्र निषेध करण्यात आला होता. विविध सामाजिक संघटना व सर्व राजकीय पक्षातर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी भोकर पोलीसांनी तीव्र गतीने तपास यंत्रणा राबवून पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 19 दिवसात दोषारोप पत्र अति सत्र न्यायालय 1 मध्ये दाखल केले. आरोपी बाबुराव सांगेराव याने गावकऱ्यांसमोर गुन्ह्याची कबुली दिली होती. सरकार पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदार तपासण्यात येऊन फिर्यादी साक्षीदाराचे साक्षपुरावा, वैद्यकीय पुरावा व आरोपी विरुद्ध सबळ पुरावा या आधारे अरोपीस दोषी ठरवत कलम 363, 302, 376 (अ), 376 (२) (जे) (एम), 376 (अब), 377 भादवी व कलम 4, 6, 8, 10, 12 पोस्को कायद्याप्रमाणे फाशीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. रमेश राजुरकर यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी एपीआय डेडवाल व पोलीस हेड काँस्टेबल फिरोज खाँ पठाण यांनी काम पाहिले. न्यायालयाने जलदगतीने न्यायनिवाडा करून 23 दिवसात मयत चिमुकलीला न्याय मिळवून दिल्याची प्रतिक्रिया समाजातील सर्व स्थरातून व्यक्त होत आहे.