फेरीवाल्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरीक-व्यापाऱ्यांचा परळीत ठिय्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एस.एम.पाटील । परळी वैजनाथ

परळीतील आठवडी बाजार परिसरातील नागरिकांना फेरीविक्रेत्यांचा मोठा त्रास असल्याची तक्रार गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होती. मंगळवारी मात्र त्याचा उद्रेक झाला. शहरातील घरणीकर रोडवर सोमवारचा बाजार भरत असतो. या बाजारामुळे परिसरातील नागरिकांचा आज उद्रेक झाला. त्यांनी भर उन्हात बसून थेट रास्ता रोको आंदोलन सुरू केले आणि घरणीकर रोडवरून सोमवारचा बाजार तसेच भाजीपाला बाजारपेठ उठवण्याचे लेखी आश्वासन नगरपरिषद देत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याची ताकीद दिली.

सोमवारच्या या बाजारामुळे परिसरात प्रचंड घाण आणि या घाणीमुळे होणारा त्रास याला घरणीकर रोडवरील नागरिक चांगलेच वैतागले होते. मंगळवारी सकाळी साडेआठ पासून रस्ता बंद करून थेट आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे टॉवर पासून बस स्टॅन्डला जाणारा मार्ग सकाळी साडेआठ पासून बंद होता. ही बाब नगरपालिकेला समजताच नगरपालिका कर्मचारी त्यांची समजूत काढण्याकरता दाखल झाले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. जोपर्यंत आम्हाला या परिसरातील भाजीपाला विक्री बंद होण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. परीसरातील व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठींबा दिला.