coronavirus – गणपतीपुळे मंदिर बंद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, मॉल, व्यायामशाळा, सिनेमागृह, नाट्यगृहांसह गर्दीची ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले असून जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बाहेरुन येणार्‍या नागरीकांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असून रत्नागिरी जिल्ह्यातील चेकपोस्टवर आणि रेल्वेस्थानकांवर आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा पुढे म्हणाले की, सध्यातरी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. मात्र पुढील पंधरा दिवस अतिशय महत्वाचे असून जिल्ह्यामध्ये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे़. रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ, कशेडी, आंबाघाट, नाटे, खारेपाटण याठिकाणी बाहेरुन येणार्‍या नागरीकांची आरोग्य तपासणी होणार आहे तसेच चिपळूण, खेड आणि रत्नागिरी रेल्वेस्थानकावर येणार्‍या प्रवाशांची तपासणी होणार आहे़ दापोली आणि मंडणगड तालुक्यांसाठी दापोली येथे, चिपळूण आणि गुहागर तालुक्यासाठी कामथे येथे, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि राजापूर तालुक्यासाठी राजापूर रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विभाग स्थापन करण्यात आला आहे ट्रॅव्हल्स एजन्सीची बैठक घेऊन परदेशात गेलेल्या व्यक्तींची नावे घेण्यात आली असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.