Ratnagiri News – शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; मुरादपूर-अमेय पार्क रस्त्यावर सिमेंट ब्लॉक बसविण्याच्या कामास प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण शहर शाखेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून मुरादपूर येथील गणपती मंदिर ते अमेय पार्क मार्गावरील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
सदर रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. या प्रश्नाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूणच्या वतीने दि. २९ एप्रिल २०२६ रोजी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर दि. १९ मे २०२६ रोजी पुन्हा नगरपरिषदेत धडक देत या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात आला होता.
यावेळी नगरपरिषद प्रशासनाने संबंधित रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सध्या निधी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, पावसाळा तोंडावर आलेला असताना नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी शिवसेनेने पर्यायी उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात सिमेंट ब्लॉक बसविण्याची मागणी लावून धरली होती. तसेच भविष्यात निधी उपलब्ध झाल्यानंतर रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती.
या मागणीसाठी विभाग प्रमुख रविराज उर्फ बापू चिपळूणकर यांनी विशेष पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला. शहर प्रमुख सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूणच्या पदाधिकाऱ्यांनीही या प्रश्नावर नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून नागरिकांची बाजू प्रभावीपणे मांडली. अखेर शिवसेनेच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून आज संबंधित रस्त्यावर सिमेंट ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे येत्या पावसाळ्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कामाच्या शुभारंभप्रसंगी शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, उपशहर प्रमुख संजय रेडीज, उपशहर प्रमुख मनोज पांचाळ, युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, विभाग प्रमुख रविराज उर्फ बापू चिपळूणकर, नगरसेवक संजय गोताड, वैशाली निमकर तसेच नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी रवी सातपुते उपस्थित होते. शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर शिवसेनेचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असून केवळ आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्ष कामे मार्गी लागेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नागरिकांच्या हिताचा विचार करून मुरादपूर-अमेय पार्क रस्त्यावरील सिमेंट ब्लॉक बसविण्याच्या कामास सुरुवात केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूणच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने यापुढेही अशाच सकारात्मक पद्धतीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.