
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्ग
शासनाच्या महत्वाकांक्षी गोवर व रूबेला लसिकरण मोहीमेचा जिल्हास्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मात्र जनतेच्या आरोग्य विषयक कार्यक्रमाकडे खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी पाठ फिरविल्याचे आज दिसून आले. जिपच्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांना जनतेच्या आरोग्यपेक्षा पक्षाचे कार्यक्रम महत्वाचे वाटत असल्याची जोरदार चर्चा या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या नंतर रंगली होती.
केंद्र शासनाच्या गोवर व रूबेला लसिकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभाविपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागा व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी नियोजन केले आहे. जिल्ह्यातील ९ महीने ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे दीड लाख बालकांना ही लस २७ नोव्हेंबर पासून पुढील चार आठवडे दिली जाणार आहे. मुलांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या महत्वाकांशी गोवर व रूबेला लसिकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम येथील डॉन बॉस्को स्कुल येथे जिप मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला जिप अध्यक्षा रेश्मा सावंत, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ हे आवर्जून उपस्थित राहतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र या महत्वाकांशी कार्यक्रमाकडे पाठ फिरवत जनतेच्या व मुलांच्या आरोग्याबाबत अनास्था दाखविली. तशी चर्चाही जोरदार रंगली होती.
जनतेच्या आरोग्यापेक्षा पक्ष मोठा?
गोवर रूबेला लसीकरण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाला जिप अध्यक्षा रेश्मा सावंत आणि आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी दांडी मारली. जिप पदाधिकाऱ्यांच्या या अनास्थेबाबत नाराजी व्यक्त होत असतानाच हे पदाधिकारी स्वाभिमान पक्षाच्या विश्वास यात्रेत सहभागी होताना दिसत होते. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना जनतेच्या आरोग्यापेक्षा पक्ष मोठा वाटत आहे की काय अशी चर्चाही सुरु होती.



























































