
गुजरातमधल्या भाजप उमेदवाराला मतांचा जोगवा मागण्यासाठी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आधार घ्यावा लागला आहे. क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा याने त्याची बायको रिवाबा जाडेजा हिच्यासह भाजपला मतदान करा असं आवाहन करण्यासाठी बाळासाहेबांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. “गुजराती लोकांनो अजूनही वेळ आहे, समजून घ्या” असं म्हणत जाडेजाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Abhi bhi time hai samaj jao gujaratiyo🙏🏻 #respect #balasahebthackeray pic.twitter.com/bwjO3Jj7iq
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 30, 2022
या व्हिडीओला आणखी एक कॅप्शन देण्यात आले आहे, ज्यात म्हटले आहे की, “या वाघाचे म्हणणे नीट ऐका.” हा व्हिडीओ व्हायरल करत जाडेजा याने त्याच्या बायकोसह भाजपच्या अन्य उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन केले आहे. “माझे हेच म्हणणं आहे की, नरेंद्र मोदी गेले, तर गुजरातही जाईल. जर नरेंद्र मोदींना तुम्ही बाजूला केलंत तर तुमचे गुजरात गेले. हेच मी अडवाणींजवळ बोललेलो आहे” असं म्हणत असतानाचा बाळासाहेब ठाकरे यांचा हा व्हिडीओ जाडेजा याने शेअर केला आहे. यावरून भाजपला गुजरातमध्येही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मते मागावी लागत असल्याचे दिसून आले आहे. जाडेजा याची पत्नी रिवाबा हिला भाजपने उत्तर जामनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तिने 2019 साली भाजपामध्ये प्रवेश केला होता. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा असून त्यातल्या 89 जागांसाठी 1 डिसेंबरला म्हणजेच आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात यांच्यासह 788 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
























































