
आर्थिक घोटाळ्यामुळे संकटात सापडलेल्या पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमसी बँकेचे लवकरच दिल्लीच्या युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीनीकरण केले जाणार आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने पीएमसी बँक खरेदी करण्यासाठी तयारी दाखवली असून यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने खरेदी योजनेचा ड्राफ्ट जारी केला आहे.
पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची चिंता सतावत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रिझर्व्ह बँकेने विलीनीकरण योजनेची माहिती देत ठेवीदारांना मोठा दिलासा दिला आहे. विलीनीकरण योजनेनुसार, युनिटी स्मॉल फायनान्स बँक पीएमसी बँकेच्या मालमत्ता आणि दायित्वांसह ठेवींची खरेदी करणार आहे. त्यामुळे पीएमसीच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींसाठी संरक्षण मिळू शकणार आहे. रिझर्व्ह बँक विलीनीकरण योजनेच्या ड्राफ्टवर 10 डिसेंबरच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत सूचना आणि हरकतींचा स्वीकार करणार आहे. त्या सूचना आणि हरकतींचा विचार करून विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे.
विलीनीकरणाच्या ड्राफ्टनुसार पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना पुढील तीन ते दहा वर्षांच्या अवधीत टप्प्याटप्प्याने त्यांच्या ठेवीचे पूर्ण पैसे परत मिळणार आहेत.
पीएमसी बँकेची खरेदी करण्यासाठी पुढे आलेल्या युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना 1100 कोटी रुपयांच्या भांडवलासह करण्यात आली आहे. वास्तविक अशा बँकेच्या स्थापनेसाठी फक्त 200 कोटी रुपयांची गरज असते.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक हा सेंट्रम ग्रुप आणि भारत पे यांचा संयुक्त उपक्रम आहे. या बँकेने याच महिन्यात 1 नोव्हेंबरला स्मॉल फायनान्स बँक म्हणून कामकाज सुरू केले आहे.
































































