विक्रमी सायकलपटू, जगातील सर्वात खडतर स्पर्धेसाठी 56 वर्षीय शरद काळे पाटील सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या रेस अक्रॉस अमेरिका या सायकल स्पर्धेत भाग घेण्यासाठी नगर सायकलिस्टचे ज्येष्ठ सदस्य शरद काळे पाटील हे पात्र झाले आहेत. डेक्कन क्लिफ हँगरच्या वतीने गोवा येथे पार पडलेल्या स्पर्धेत शरद काळे पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. त्यानंतर रेस अक्रॉस अमेरिका स्पर्धेसाठी त्यांचा मार्ग सुकर झाला. जीवनात ध्येयाचा पाठलाग करताना वय फक्त आकडा असतो, हेच 56 वर्षीय काळे पाटील यांनी दाखवून दिले आहे.

शरद काळे पाटील यांनी डेक्कन क्लिफ हँगर स्पर्धेत भाग घेतला होता. ही 643 किमीची सायकल स्पर्धा असून 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजता भूगाव पुणे येथून स्पर्धेची सुरुवात झाली. ‘सोलो’साठी 50 स्पर्धक होते, तर एकूण 16 टीम होत्या. पुणे, मुंबई, नागपूर, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सर्वात खडतर अशी ही सायकल स्पर्धा असून पुणे ते गोवा यादरम्यान सायकलस्वारांना कात्रज, खंबाटकी, पसरणी, तवंडी व चोर्ला या घाटातून प्रवास करावा लागतो. प्रत्येक वर्षी पुण्यातून या स्पर्धेची सुरुवात होते तर शेवट गोव्यात होतो. जे स्पर्धक ही स्पर्धा 32 तासांमध्ये पूर्ण करतील, त्यांना अमेरिकेत होणाऱ्या जगातील सर्वात अवघड अशा रेस अक्रॉस अमेरिका या सायकल स्पर्धेमध्ये सहभाग घेता येतो. अमेरिकेतील स्पर्धेसाठी प्रवेश मिळणे हीच एक मोठी अवघड गोष्ट आहे.

– मागील तीन वर्षांपूर्वी शरद काळे पाटील यांनी सायकलिंगचा श्रीगणेशा केला व आजपर्यंत त्यांनी सात वेळा सुपर रांडोंनियर हा किताब पटकविला. त्यांनी सायकलिंग क्षेत्रात तसेच मोटरसायकलिंगमध्ये अनेक विक्रम करून नगरचे नाव देश पातळीवर पोहचविले आहे.

– ऑगस्टमध्ये इडेनबर्ग, लंडन येथे होणाऱ्या 1530 किलोमीटर सायकल स्पर्धेमध्ये ते भाग घेणार आहेत. संपूर्ण जगातून 2000 सायकलिस्ट यासाठी पात्र झाले आहेत. 1530 किलोमीटरचे अंतर सायकलस्वारांना 125 तासांच्या आत पूर्ण करावयाचे आहे. लंडनमधील सगळय़ात अवघड अशी ही स्पर्धा असून सायकलस्वारांना थंडी, वारा, पाऊस तसेच नेव्हिगेशनची सगळय़ात मोठी अडचण असणार आहे. यावर मात करून सायकलस्वारांना हे अंतर पूर्ण करावयाचे आहे.