
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
श्री विठ्ठलाचे शॉर्टकट दर्शन देण्यास मंदिर समिती व्यवस्थापनाने नकार दिल्याने, भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करुन जातीवाचक शिवीगाळ केली. दिवाळीच्या सुट्टी असल्याने श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची तोबा गर्दी आहे. दर्शन रांगेतील भाविकांना सात ते आठ तास उभा राहिल्यानंतर पदस्पर्श दर्शन मिळते आहे.
या घाईगर्दीत भाजप शहराध्यक्ष वाईकर हे 10 ते 12 लोक घेऊन मंदिराच्या कार्यालयात घुसले. माझ्या लोकांना शॉर्टकट दर्शनाला सोडा असे फर्मान त्यांनी मंदिर व्यवस्थापनाला सोडले. त्यांच्या या फर्मानावर मंदिरामध्ये उपस्थित असलेले पंढरपूरचे प्रांताधिकारी, तथा समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी भाविकांच्या गर्दीमुळे व्हीआयपी दर्शन बंद असल्याचे वाईकर यांना सांगितले. या नकारात्मक प्रतिसादामुळे वाईकर यांचा पारा चढला आणि त्यांनी अधिकारी अन कर्मचाऱ्यांची अर्वाच्य भाषेत आई माई काढली.
अधिकारी आणि वाईकर यांच्यातील शाब्दिक चकमक सोडविण्यासाठी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे अन काही कर्मचारी सरसावले. मात्र वाईकर यांचा पारा शांत होण्याऐवजी अधिकच चढला. अन त्याच जोशात त्यांनी समितीचे कर्मचारी विनोद वाघमारे यांच्याशी वाद घातला.
वाईकर यांच्या मंदिरातील राड्याप्रकरणी वाघमारे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दमबाजी, जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी तक्रार दिली असून वाईकर यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.




























































