रिक्षा-टॅक्सीचालकांना प्रवासी भाडे नाकारणे महागात पडणार, आरटीओकडून दंडात्मक कारवाईचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जवळचे प्रवासी भाडे नाकारणाऱया रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई तीव्र केली आहे. शहर आणि उपनगरांतील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून (आरटीओ) रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर कारवाईची मोहीम राबवली जात आहे. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने आरटीओकडून कठोर कारवाई केली जात असल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांचे धाबे दणाणले आहेत.

रिक्षा आणि टॅक्सीचालकांकडून जवळचे भाडे नाकारण्याच्या प्रवृत्तीमुळे मुंबईकरांना प्रवासात मनस्ताप सहन करावा लागतो. यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांची प्रचंड गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली येथील आरटीओ कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. चारही प्रमुख आरटीओ विभागांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. रेल्वे स्थानके, बस डेपो आणि गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांना ताटकळत ठेवणाऱया आणि मनमानी करणाऱया चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

ताडदेव आरटीओची सर्वाधिक कारवाई

मागील पाच महिन्यांत ताडदेव आरटीओने प्रवासी भाडे नाकारणाऱया 207 टॅक्सीचालकांवर कारवाई केली आणि त्यांच्याकडून 5 लाख 33 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. तसेच 167 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. बोरिवली आरटीओने दोन महिन्यांत 173 वाहने तपासली, तर 25 प्रकरणे निकाली काढून 62,500 रुपये दंड वसूल केला. याव्यतिरिक्त 25 जणांचा परवाना निलंबित केला. वडाळा आरटीओने 46 तक्रारींवर दंडात्मक कारवाई केली.

रेल्वे स्थानके आणि एसटी बस स्थानके क्षेत्रात पथके

रेल्वे स्थानके आणि बस आगारांच्या परिसरात भाडे नाकारण्याच्या तक्रारींचे प्रमाण जास्त नोंद झाले आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच सीएसएमटी, चर्चगेट, दादर, कुर्ला, बोरिवली आणि लोकमान्य टिळक टर्मिनस यांसारखी प्रमुख रेल्वे स्थानके, दादर आणि बोरिवली येथील एसटी बस स्थानक परिसरात आरटीओची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.