Omicron Variant – महिनाभराने मोठा दिलासा; मुंबईत बाधितांची संख्या हजारांच्या खाली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आली असून तब्बल महिनाभराने दिवसभरात एक हजारांच्या खाली रुग्णनोंद झाली आहे. मुंबईत दिवसभरात 960 कोरोनाबाधित आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत डिसेंबरअखेरीस कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्येने थेट 21 हजारांचा टप्पा गाठल्याने मुंबईचे टेन्शन वाढले होते. मात्र आता रुग्णसंख्या चांगलीच घटली असून एक हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत केलेल्या 45 हजार 618 चाचण्यांमध्ये हे बाधित आढळले आहेत. यातील 106 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 30 जणांना ऑक्सिजनची गरज लागली.

 सक्रिय रुग्णांची संख्याही घटली

  • मुंबईत गेल्या 24 तासांत 1837 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत सद्यस्थितीत 9900 सक्रिय रुग्ण राहिले आहेत. यातील 90 टक्क्यांहून जास्त रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तर सद्यस्थितीत 465 जण अत्यवस्थ आहेत.
  • मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 421 दिवसांवर पोहोचला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के झाले आहे. तर रुग्णवाढीचे प्रमाण 0.16 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. मुंबईत सध्या 90 टक्क्यांहून जास्त बेड रिक्त आहेत.