
सामना ऑनलाईन । हैदराबाद
आंध्र प्रदेशात ‘विरोधी पक्ष ‘वायएसआर काँग्रेस’ पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले पंखे सर्व सरकारी कार्यालयांतून हटवा’ अशी मागणी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. या अजब मागणीमुळे निवडणूक आयोगाचे अधिकारीही बुचकळ्यात पडले आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे सर्व सरकारी कार्यालयांत लावलेले फोटो हटवले. यावरून तेलगू देसम पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे झाले पाहिजे असे तेलगू देसम पक्षाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे नेते जयाशंकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले.
मुख्यमंत्र्याचे पुतळे झाकता, मग पंखेही काढा!
आचारसंहितेमुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व पुतळे झाकले असून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे सरकारी कार्यालयांतील फोटोही काढले आहेत. हा नियम सर्वांनाच लागू झाला पाहिजे. विरोधी पक्ष असलेल्या ‘वायएसआर काँग्रेस’ पक्षाचे निवडणूक चिन्ह पंखा आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांतील सर्व पंखे काढून टाकावेत. ते पंखे सरकारी कार्यालयांत ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेऊ शकतात अशी मागणी पक्षाचे अन्य कार्यकर्ते मनोहर यांनी केली.
























































