आरक्षण म्हणजे वेळेची बरबादी! मोदींचा जुना व्हिडीओ नव्याने व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-fail-lok sabha

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होऊन राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी पोहोचले आहे. या आरक्षणासाठी स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी आरक्षण म्हणजे वेळेची बरबादी असल्याचं विधान केलं होतं. समृद्धता नांदली तर कोणी आरक्षणाबद्दल बोलणारच नाही असं त्यांचं मत होतं. मुख्यमंत्री असतानाची त्यांची ही भुमिका पंतप्रधान झाल्यानंतर कशी काय बदलली असा प्रश्न विरोधकांनी विचारायला सुरूवात केली आहे.

न्यूजतक या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. मोदींची 2013 साली एक मुलाखत घेण्यात आली होती या मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले होते की “जर प्रत्येकाला शिक्षणाची संधी उपलब्ध झाली, प्रत्येकाला रोजगार मिळाला तर आरक्षणाला विचारतंय कोण? असं करणं (आरक्षणाबाबत बोलणं) ही वेळेची बरबादी आहे. कारण आपले अर्थतंत्र हे अभावतंत्र आहे. समृद्धीचे युग तयार झाल्यास आरक्षणाबाबत कोणीच बोलणार नाही. कमतरतेला अधिक्यामध्ये बदलावे लागेल आणि गुजरात हे समृद्धीचे मॉडेल आहे.”

2013 साली व्यक्त केलेल्या या मतांच्या विपरीत भूमिका सध्या मोदी घेत आहे. सोलापूर, आग्रा इथे बुधवारी झालेल्या जाहीर सभांमध्ये सवर्णांना आरक्षण देण्याबाबत मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. आम्ही आदिवासी,दलित यांच्या आरक्षणाला धक्का न लावता सवर्णांना वेगळं आरक्षण दिल्याचं मोदींनी सभांमध्ये सांगितलं. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी इतरांच्या आरक्षणावर डोळा ठेवत लोकांचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.