नेरूर मार्गावरील गाड्या पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

कुडाळ एस.टी आगाराच्या नवीन वेळापत्रकामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कुडाळ नेरूरमार्गे कवठी मार्गावर व कुडाळ नेरूरपार मार्गे धामापूर मार्गावर धावणाऱ्या सर्व एस. टी. गाड्या तातडीने पूर्ववत कराव्यात अन्यथा ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख तथा नेरूर देऊळवाडा ग्रा.पं.चे सरपंच धनंजय (शेखर) गावडे यांनी कुडाळ एस.टी. आगार प्रशासनाला दिला आहे. गावडे यांनी याबाबतचे निवेदन बुधवारी आगारप्रमुख सुजीत डोंगरे यांच्याकडे सादर केले आहे.

कुडाळ आगाराने गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याने नेरूर गावातील कुडाळ येथे जाणा-या शाळकरी मुलांसह ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कवठी नेरूरमार्गे कुडाळ या मार्गावर सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत कुडाळला जाण्यासाठी गाडीची नसल्याने मुलांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या गाड्या पूर्ववत करून प्रवाशांची गैरसोय तात्काळ दूर करावी. तसेच सकाळी ६.३० वाजता शालेय मुलांसाठी सुरू केलेली कुडाळ नेरूरपार मार्गे धामापूर ही गाडी बंद केल्याने नेरूरपार येथील कुडाळला येणा-या मुलांना वेळेत शाळेत पोचता येत नाही. ही गाडी तातडीने सुरू करावी. नेरूर भागातील एस.टी.च्या प्रश्नांबाबत गांभीर्याने लक्ष देऊन गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी सरपंच गावडे यांनी निवेदनाद्धारे एस.टी. प्रशासनाकडे केली आहे. आगारप्रमुख सुजीत डोंगरे यांनी याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन सरपंच गावडे यांना दिले. यावेळी सुमन सडवेलकर, बाबल वालावलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.