राधेश्याम मोपलवार यांची लवकरच राजकारणात एण्ट्री! भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून पायउतार झालेले वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार हे लवकरच राजकारण प्रवेश करणार आहेत. भाजपच्या तिकिटावर नांदेड किंवा हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ते आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये असलेले राधेश्याम मोपलवार यांची बुधवारी एमएसआरडीतून उचलबांगडी करण्यात आली. 2018 मध्ये सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यावरही सलग सातवेळा मुदतवाढ मिळवत एमएसआरडीसीत ठाण मांडून बसलेल्या मोपलवार यांना पदावरून हटविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. दरम्यान, मोपलवार यांना आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठीच पदावरून दूर करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या मोपलवार यांना मराठवाडय़ातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असून ते लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

लातूरचे उप जिल्हा अधिकारी पदापासून कारकीर्द सुरू केलेले राधेश्याम मोपलवार हे  प्रशासकीय वर्तुळातील वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जातात. एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणाची त्यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यावर विधिमंडळात गदारोळ झाला होता. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते, पण त्यांना फडणवीस सरकारने पाठीशी घातले. फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग मोपलवार यांनी मार्गी लावला होता.

नांदेड किंवा हिंगोलीतून उमेदवारीसाठी इच्छुक

नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून मोपलवार यांनी 2005 ते 2009 या काळात काम पाहिले आहे. नांदेड शहरातील विकासकामांना त्यांच्या काळात खूप मोठी गती मिळाली होती. शिवाय जिह्यात त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे. नांदेड जिह्यातील किनवट, हादगाव या दोन विधानसभा मतदारसंघांचा हिंगोली लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. त्यामुळे मोपलवार हे नांदेड किंवा हिंगोलीतून लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.