टार्गेट किलिंगला उत्तर देण्यासाठी प्लॅन तयार, अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यात बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी स्थानिक तरुणांना आमिष दाखवून त्यांची भरती करत आहेत. जम्मू-काश्मीरमधील हे दहशतवादी निवडकपणे काश्मिरी पंडित, गैर-काश्मिरी हिंदू आणि देशभक्त मुस्लिमांची हत्या करत आहेत. गेल्या 3 दिवसात 3 हिंदू मारले गेले आहेत. यावर्षी काश्मीर खोऱ्यात आतापर्यंत 18 टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. यामुळे गृहमंत्रालय खडबडून जागे झाले आहे. या प्रश्नावर आता गृहमंत्री अमित शाह दुसऱ्यांदा अजित डोवाल यांची भेट घेत आहेत. शाह यांनी काल डोवाल आणि रॉ प्रमुखांची भेट घेतली. आज जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा एनएसए डोवाल, लष्करप्रमुख मनोज पांडे यांच्यात बैठक झाली आहे. या बैठकीत टार्गेट किलिंगला सामोरे जाण्याच्या रणनीतीसोबतच अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेवरही चर्चा करण्यात आली. यात टार्गेट किलिंगविरोधात योजनाही तयार करण्यात आली आहे.

काश्मीर खोऱ्यातील टार्गेट किलिंगच्या घटनांनी 90 च्या दशकातील भयानक आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. येथे उरलेल्या काश्मिरी पंडितांचे पलायन पुन्हा एकदा सुरू झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी दहशतवादविरोधी कारवाई तीव्र केली आहे. याशिवाय, 2019 मध्ये कलम 370 अंतर्गत राज्याला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती सामान्य झाल्यामुळे दहशतवादी संतापले आहेत. या रागात त्यांनी टार्गेट किलिंग सुरु केली आहे.

दहशतवाद्यांनी तीन दिवसांत एक काश्मिरी आणि दोन बिगर-काश्मिरी हिंदूंची हत्या केली. मंगळवारी कुलगाममधील शाळेबाहेर दहशतवाद्यांनी रजनी बाला नावाच्या सरकारी शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली. गुरुवारी कुलगामच्या अरेह गावात दहशतवाद्यांनी स्थानिक बँकेचे बँक व्यवस्थापक विजय कुमार (27) यांची गोळ्या झाडून हत्या केली. कुमार यांच्या हत्येनंतर काही तासांनी दहशतवाद्यांनी बडगाममध्ये गैर-काश्मीरी मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात दिलखुश कुमार यांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी तहसील परिसरात घुसून लिपिक राहुल भट यांची गोळ्या घालून हत्या केली होती.

विजय कुमार यांच्या हत्येनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीत NSA अजित डोवाल आणि RAW प्रमुख सामंत गोयल यांच्यासोबत बैठक घेतली. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आणि जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी एलजी मनोज सिन्हा यांच्यासोबत शाह यांची बैठक प्रस्तावित होती, परंतु त्याच्या एक दिवस आधी त्यांनी दहशतवादविरोधी रणनीतीवर चर्चा करण्यासाठी NSA सोबत बैठक घेतली.

टार्गेट किलिंगमध्ये गुंतलेले बहुतेक दहशतवादी असे आहेत ज्यांचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही किंवा त्यांनी कोणत्याही दहशतवादी छावणीत प्रशिक्षणही घेतलेले नाही. हे हायब्रीड दहशतवादी सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हान बनले आहेत. याला सामोरे जाण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलीस अशा दहशतवाद्यांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. दुसरीकडे ज्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे, ते पाकिस्तानी आहेत की स्थानिक तरुण हे तपासून सोशल मीडियावर घोषणा करून दहशतवादी कारवाया करणाऱ्यांवर सुरक्षा दल लक्ष केंद्रित करेल.