बंगल्यात घुसून पिस्तुलाच्या धाकाने ऐवज लुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

घरामध्ये घुसलेल्या चार चोरट्यांनी कानफटीला पिस्तूल लावून आणि चाकूचा धाक दाखवून घरमालक व नोकरांचे हात, पाय बांधून त्यांना डांबून ठेवले. घरातील रोख रक्कम व दागिने असा ५ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. त्यानंतर १ कोटी रुपयांची मागणी करून ही रोकड मुंबईतून घेण्यासाठी चालकाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून घेऊन गेले. आपटे रस्त्यावरील बंगल्यामध्ये सुमारे अडीच तास हा थरार सुरू होता. थेट बंगल्यात घुसून ज्येष्ठ नागरिकांना धमकावून चोरीच्या प्रकाराने खळबळ उडाली.

हेमाजी गुलाबचंद छेडा (वय ६३, रा. सरोज सदन बंगला, अपटे रस्ता) यांनी यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेमाजी छेडा यांचे मेहुणे हंसकुमार खेमजी (वय ७९, रा. सरोज सदन, सध्या रा. मुंबई) यांचा आपटे रस्त्यावर आपटे प्रशालेच्या शेजारी सामाजिक कार्यकर्ता कै. बी. एस. देशपांडे पथवर सर्वात शेवटी ‘सरोज सदन’ नावाचा बंगला आहे. हा बंगला त्यांना विकायचा असल्याने त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अधूनमधून मुंबईवरून पुण्यात येत असतात. त्यावेळी त्यांच्यासोबत हेमाजी छेडा, कारचालक शिवाजी मेदगे (वय ५०), नोकर अनंत रामचंद्रवले (वय ४५) आणि मोलकरीण करणताई (वय ६०) हेदेखील पुण्याला येतात.

मंगळवारी हे सर्वजण पुण्याला आले. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास छेडा यांना चहा प्यायचा असल्याने ते त्यांचा चालक मेदगे यांना फोन करत होते, त्यांचा फोन लागत नव्हता, ते घराच्या बाहेर आहेत का हे पाहण्यासाठी म्हणून बंगल्याचे दार उघडून बाहेर येताच अचानक चौघे त्यांच्यासमोर आले, त्यांनी पिस्तूल त्यांच्यावर रोखून तोंड दाबून घरात नेले ‘आवाज मत करो, तुम्हे मार डालेंगे, चुपचापसे हमे पैसे दे, पैसा कहां छुपाया है हमे बता दो असे’ असे धमकावले. त्याचवेळी मोलकरणी करणताई या तेथे आल्या. त्यांच्यावरही पिस्तूल ताणून शांत होण्यास सांगितले. या दोघांना पकडून स्वयंपाकघराशेजारील खोलीमध्ये नेले. तेथे पूर्वीपासूनच चालक मेदके आणि अनंत खले यांना हातापायाला, तोंडाला चिकटपट्टी बांधून डांबून ठेवण्यात आले होते. खोलीमध्ये नेऊन करणबाई यांनाही बांधून ठेवले. चौघांपैकी दोघेजण त्यांच्याजवळ थांबून राहिले, तर इतर दोघे छेडा यांना खोलीच्या बाहेर येऊन पैसे दे म्हणून धमकावले. त्यांनी छेडा यांचे मेहुणे खेमजी हे झोपलेल्या खोलीत त्यांना घेऊन गेले. तेथे सामानाची, बॅगेची उचकापाचक करून त्यातून रोख एक लाख रुपये, डायमंड रिंग, गळ्यातील सोन्याची साखळी, घड्याळ, मोबाईल, सोन्याच्या पाटल्या असा एकूण ५ लाख ७० हजारांचा ऐवज काढून घेतला.

त्यानंतर या आरोपींनी एक कोटी रुपयांची मागणी केली, त्यावेळी छेडा यांनी ही रक्कम इथे नाही, मुंबईला गेल्यास मिळेल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी चालक मेदगे यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून चौघेही मुंबईच्या दिशेने गेले. कुर्ला ब्रिजजवळ गाडी थांबवून चालक व मेदगे यांना एक कोटी रुपये आणायला सांगून, हे चौघेही गाडीतून उतरून पळून गेले.

वरिष्ठ निरीक्षक भास्कर जाधव म्हणाले, या प्रकरणाचा तपास पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेकडून सुरू आहे. अद्यापि कोणालाही अटक केली नाही, लवकरच या गुन्ह्याचा छडा लागेल.

दरवाजा वाजविल्याने नाट्य संपले
घरात सुमारे अडीच तास हा प्रकार सुरू होता, हे चौघे आरोपी पळून जात असताना अचानक कोणी तरी मुख्य दरवाजा खटखटकावला. त्यामुळे त्यांची घाबरगुंडी उडाली. छेडा व इतरांनी त्यांना डांबलेल्या खिडकीतून चोर चोर म्हणून ओरडल्याने शेजारी मदतीला धाऊन आले. त्यावेळी हे चौघेही चालकाला घेऊन डायनिंग हॉलच्या गॅलरीतून उडी मारून पळून गेले. शेजाऱ्यांनी घरात येऊन या तिघांची सुटका केली.