रोखठोक: नसिरुद्दीन, गाय आणि माणूस, जरा विषय समजून घ्या!

rokhthokगाय महत्त्वाची की माणूस? असा प्रश्न अभिनेता नसिरुद्दीन शहाने विचारला व तो ‘गद्दार’ ठरवला गेला! बुलंद शहरात एका पोलीस अधिकाऱयाची हत्या गाईवरून झाली. त्यावर चिंता व्यक्त करणे हा प्रत्येक हिंदुस्थानीचा अधिकार आहे, पण समजून घ्यायला कोणी तयार नाही!

अभिनेता नसिरुद्दीन शहा यांनी एक वक्तव्य केले. त्याचे पडसाद पंधरा दिवसांनंतरही उमटत आहेत. नसिरुद्दीन असे म्हणाले की, ‘एका पोलीस निरीक्षकाच्या मृत्यूपेक्षा गाईच्या मृत्यूला महत्त्व दिले जात आहे. देशाच्या वातावरणात मोठय़ा प्रमाणात विष कालवले जात आहे. अशा परिस्थितीत माझ्या मुलाची मला काळजी वाटते.’ असे नसिरुद्दीन म्हणाले तेव्हा त्यांना ‘मुल्ला’ नसिरुद्दीन ठरवून एका विशिष्ट वर्गाने झोडपून काढले. नसिरुद्दीन यांच्या वक्तव्यावर टीका किंवा चर्चा होऊ शकते, पण या वक्तव्याबद्दल त्यांना पाकिस्तानात चालते व्हा असे सांगितले गेले. उत्तर प्रदेशात बुलंद शहर येथे ‘गोमांस’ विकले जाते या कारणावरून दंगा भडकला व एका झुंडीने पोलीस अधिकाऱयाची हत्या केली. त्यावरूनच आपल्या देशात पोलिसाच्या हत्येपेक्षा गोहत्या अधिक महत्त्वाची ठरली, असे विधान या अभिनेत्याने केले व वादळ निर्माण झाले. श्री. नसिरुद्दीन शहा म्हणतात, ‘माझ्या देशाबद्दल बोलताना मला वाटलेली चिंता मी व्यक्त केली. म्हणून लोकांनी मला गद्दार ठरवावे?’ देशाचे वातावरण बिघडवून पुन्हा धर्म, जात पातळीवर तडे जावेत असे ज्यांना वाटते त्यांनी देशाची नाजूक स्थिती समजून घेतली पाहिजे. गोध्रा दंगलीनंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही अशीच चिंता वाटली होती व त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी राजधर्माचे पालन करण्याविषयी मार्गदर्शन केले होते. म्हणून तुम्ही अटलजींनाही दोष देणार काय?

आत्मपरीक्षण!
नसिरुद्दीन शहा यांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करणाऱयांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. गाय महत्त्वाची की माणूस, हा प्रश्न नसिरुद्दीन शहांना पडला. तसा तो हिंदुत्ववादाचे जनक वीर सावरकर यांनाही पडला होता. गाईसाठी माणसाची हत्या करणारे नराधम आहेत. ज्यांना गाय ही ‘गोमाता’ वाटते त्यांच्या श्रद्धांचा आदर व्हायला हवा. पण गोवा व ईशान्येकडील अनेक राज्यांत भाजपचे सरकार आहे. तेथे गाय ही गोमाता नाही आणि गोमांस हे अन्न आहे. तेथे गाय मारली म्हणून माणसांच्या हत्या होत नाहीत. मुंबईसारख्या शहरात फक्त मांसाहार करतात म्हणून मराठी माणसांना घरे नाकारणारे जैन धर्मीय आहेत व जैन समाज आज मोदीसमर्थक आहे. गाय कापणारे व मराठी माणसांना मांसाहार करतात म्हणून घरे नाकारणारे एकाच मनोवृत्तीचे आहेत व या दोघांपासून समाजाला धोका आहे. नसिरुद्दीन शहांसारखे कलाकार गाय व माणसांवर बोलतात, पण मुंबईतील शाकाहारींच्या हिंसाचारावर कधी बोलत नाहीत.

किती हत्या झाल्या?
बुलंद शहरात गाय मारण्यावरून एका पोलीस अधिकाऱयाची हत्या झाली. गोमांस बाळगल्यावरून आतापर्यंत किमान पन्नास हत्या देशात झाल्या आहेत. नोटाबंदीने शंभरावर बळी घेतले. कश्मीरात रोज सैनिक मरत आहेत. पण देशात चर्चा घडते व झडते ती फक्त गोहत्या व त्यानिमित्त होणाऱया मनुष्यहत्यांची. मुसलमान बीफ खातो तसे इतर धर्माचे लोकही खातात. बीफ खाणारे काही लोक मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत व त्यांना सरकारी सुरक्षेत गोमांस खाण्याचा संपूर्ण अधिकार त्यामुळे मिळाला आहे. ही गंमतच आहे.

भक्तांचा हल्ला
सिनेसृष्टीत एक मोठा वर्ग असा आहे जो आपल्या भावना नेहमीच व्यक्त करीत असतो. दुसरा वर्ग येईल त्या सरकारची चमचेगिरी करून सत्ता व पदे मिळवतो. हिंदुस्थानात अमिताभ बच्चन हे आजही शिखरावर आहेत, पण राजकीय विषयांवर ते कधीच मतप्रदर्शन करीत नाहीत. हा संयम त्यांनी पाळला आहे. कारण काँग्रेसच्या गांधी घराण्यापासून उत्तर प्रदेशच्या मुलायमसिंग यादवांच्या प्रचारात एकेकाळी संपूर्ण बच्चन कुटुंब उतरले होते. चाहत्यांना ते आवडले नाही. नसिरुद्दीन शहा व त्यांच्यासारखे इतर कलाकार ‘मुसलमान’ म्हणून एका भीतीने मतप्रदर्शन करतात व मोदींचे भक्त त्यांच्यावर तुटून पडतात. अर्थात श्री. शहा यांनी मुसलमान म्हणून पाकिस्तानचे गोडवे गायले नाहीत हेदेखील लक्षात घ्यायला हवे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे एक भाऊ हिंदुस्थानातील लष्करात सेवा बजावून निवृत्त झाले आहेत व त्यांनी ईशान्येकडील सीमेवर देशरक्षणाचे मोठे काम केले आहे. नसिरुद्दीन शहा यांनी त्यांचे मत संयमाने व्यक्त केले. उत्तर प्रदेशातील आझम खान छाप वक्तव्य त्यांनी केले नाही; मात्र शहा यांना पाकिस्तानात चालते व्हा असे सांगणारे मोदीभक्त ज्याप्रकारे थयथयाट घालताना दिसले तो प्रकार किळसवाणा आहे. आमीर खान, शाहरुख खान यांनीदेखील पूर्वी अशाच प्रकारची विधाने केली होती, पण या दोन्ही खानांच्या कार्यक्रमात भाजपचे नेते, मुख्यमंत्री जातात व मांडीला मांडी लावून बसतात. प्रत्येकाला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य या देशात आहे हे समजून घेतले पाहिजे.

हे करून दाखवा!
श्री. राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींविरोधात रोज बोलत आहेत, म्हणून सरकारने त्यांच्या मुसक्या आवळलेल्या नाहीत. राहुल गांधी व त्यांचे संपूर्ण खानदान कसे मुसलमान वंशाचे हे सिद्ध करण्याचा ‘आटापिटा’ मधल्या काळात सोशल मीडियावर झाला. आता नसिरुद्दीन शहांना देशविरोधी ठरविण्यासाठी तेच सुरू आहे. येथील मुसलमानांना सरसकट पाकिस्तानात पाठवून त्यांची ताकद वाढविण्यापेक्षा पाकिस्तानलाच हिंदुस्थानात आणून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न (संघाचे) साकार करण्यावर भर द्या. तसे साकडे मोदींना घाला. किमानपक्षी पाकच्या कब्जातील कश्मीर तरी घेऊन या. नसिरुद्दीन शहांच्या आधी अनेक हिंदू विचारवंतांनी तीच भावना, भीती व्यक्त केली आहे. मग त्या सगळय़ांना तुम्ही कोणत्या देशात हाकलून देणार आहात?

हीच खरी वेदना
‘भारत ही माझी मातृभूमी आहे. देशावर टीका करण्याच्या मलाही वेदना होतात. पण देशात जर चुकीचे काही घडत असेल तर मी बोलतच राहणार. माझ्या चार पिढय़ा या देशात जन्मल्या आहेत. माझा जन्मही इथेच झाला. माझी मुलेही इथेच राहतील. मी देशभक्त आहे हे मला ढोल वाजवून सांगण्याची गरज नाही’, असे नसिरुद्दीन शेवटी म्हणाले. ‘मला माझ्या मुलांची चिंता वाटते. कारण त्यांचा कोणता धर्म नाही. आम्ही आमच्या मुलांना धर्माची शिकवण दिली नाही. कारण चांगले किंवा वाईट याचे धर्माशी देणे घेणे नाही. उद्या माझ्या मुलांना एखाद्या जमावाने घेरले आणि तुमचा धर्म कोणता असे विचारले तर ते काय उत्तर देणार याची चिंता वाटते. कारण त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नसेल.’ ही नसिरुद्दीनची वेदना असेल तर त्यांची वेदना समजून घेतली पाहिजे.

समजून घेण्याच्या मनःस्थितीत आज देश नाही. देश बधिर झाला आहे.

@rautsanjay61
– rautsanjay61@gmail.com

एक प्रतिक्रिया

  1. Cow is more important than cow eater man. Cow eater man eats cow and gives shit after few hours. Whereas cow eats grass and gives milk. What is milk and are its derivatives,you do research. Cow gives birth to cow or bull. Cow eater gives birth to cow eaters. Birth given cow again gives milk. By this time I hope you must have researched benefits of milk and its derivatives. What a bull can benefit whole his life, you do research again. Power is measured in horse power. Bull has more power than horse. Bulls buffalos etc. human friendly animals can produce so much power for Hindus ( Jain and Hindu means pure vegetarian only) that they do not need petrol diesel to import from enemy muslim countries. Why cow is Hindus God? Cow sustains Hindus life. What is good? Cutting the golden egg giving hen to eat or allowing it to give golden egg life time? Cow is 1000 times greater than cow eater men.