
सहाव्या वरिष्ठ गटाच्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेचे बिगुल वाजले असून, शुक्रवार दि. 21 पासून या रोमहर्षक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 27 देश सहभागी झाले असून, ते विजेतेपदासाठी कौशल्य पणाला लावणार आहेत.
ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉलमध्ये रंगणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्र व शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सायं. 4 वाजता करण्यात येणार असून, यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंग, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात येणार असून, यावेळी विविध कलाकार कलाविष्कार सादर करणार आहेत. स्पर्धेची पहिली लढत पुरुष विभागातील होणार असून, या लढतीमध्ये हिंदुस्थानसमोर पोलंड संघाचे आव्हान असणार आहे. महिला विभागातील पहिली लढत ‘अ’ गटातील नेपाळ व इजिप्त या दोन संघांदरम्यान होणार आहे. पुरुष विभागातून 23 संघ, तर महिला विभागातून 11 संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेची गटवारी : पुरुष विभाग : अ गट : हिंदुस्थान, अर्जेंटिना, इजिप्त, फिजी, पोलंड व युगांडा.
‘ब’ गट : केनिया, श्रीलंका, आयव्हरी कोस्ट, प्रâान्स, इराण व सिएरा लिओन. ‘क’ गट : बेलारूस, सौदी अरेबिया, नेपाळ, गिनी, ओमान व ब्राझील. ‘ड’ गट : न्यूझीलंड, येमेन, यूएई, इंग्लंड, लॅटव्हिया.
महिला विभाग : ‘अ’ गट : केनिया, प्रâान्स, आयव्हरी कोस्ट, श्रीलंका, नेपाळ व इजिप्त. ‘ब’ गट : हिंदुस्थान, पोलंड, लॅटव्हिया, अर्जेंटिना, सिएरा लिओन.





























































