
सामना प्रतिनिधी । सटाणा
उन्हाळी व पावसाळी लाल कांद्याला अवघा 300 ते 400 रुपयांपर्यंत कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे संतापलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, 26 नोब्हेंबरपर्यंत कांद्याच्या भावात सुधारणा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारादेखील देण्यात आला.
गेल्या आठवडय़ापासून कांद्याच्या भावात प्रचंड प्रमाणात घसरण झाल्याने भरदुष्काळात पिकविलेला कांदा कवडीमोल भावात बाजारात विकावा लागत आहे. जिह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल व उन्हाळी कांदा 400 ते 500 रुपये प्रतिक्विंटल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादन करण्यासाठी एकरी सुमारे 80 हजार रुपये खर्च येत असताना कांदा उत्पादन विक्रीतून खर्चदेखील वसूल होत नाही. केंद्र शासनाच्या वतीने कोसळलेल्या कांदा बाजार भावात हस्तक्षेप करावा आणि करून सुमारे दोन हजार प्रति क्विंटल दराने शासनाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा. तालुक्यात गंभीर स्वरूपाची दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. पिकवलेल्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची घोषणादेखील हवेतच विरली आहे. शेतमालाच्या बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट आहे. बाजारभावात सुधारणा होण्याच्या दृष्टीने तत्काळ निर्णय घ्यावेत व नाफेडच्या माध्यमातून केंद्र शासनाने 2000 रुपये प्रति क्विंटल कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
रास्ता रोकोमध्ये कांदा उत्पादक शेतकरी काकाजी सोनवणे, शैलेश सूर्यवंशी, किशोर कदम, शेतकरी नेते जिभाऊ खंडू सोनवणे, माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, दीपक रौंदळ, संजय पवार, किरण पाटील, अमोल बच्छाव, सचिन जाधव, वाय. के. खैरनार, रामदास सोनवणे, कडू अहिरे, केशंव मांडवडे, साहेबराव सूर्यवंशी, पंडीत इंगळे, जे.डी.पवार, देविदास सोनवणे, पंडीत इंगळे, सुनील पवार, केवळ सोनवणे, संजय देवरे, योगेश अहिरे, प्रभाकर पगार, विलास चव्हाण आदींसह कांदा उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाप्रसंगी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक देवेंद्र शिंदे, अनिल बुबा, अजय महाजन, व्ही. एस. डंबाळे, राहुल निकम आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.




























































