
>> उदय जोशी । बीड
बीडमध्ये भाजपाची खरी लढत अफवांविरोधात असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. आमची लढाई ही वाईट विचार, अपप्रवृत्तींविरोधात आहे आणि यात आम्ही विजय मिळवणार आहोत. हे निश्चित असल्याचे पंकजा मुंडे यांनी ठामपणे सांगितले.
बीड लोकसभा मतदार संघात 18 एप्रिल रोजी मतदान आहे. या पार्शवभूमीवर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना शिवसेना आणि रिपाइं ताकदीने आमच्या पाठीशी उभे आहेत तसेच अनेक संघटना सोबत आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रीतम मुंडे यांचे दोन मतदार संघात नावे कसे याची माहिती घेतली गेली. वरळीमध्ये नावे आहेत त्यात फोटो नाही, नाव कोणी नोंदवले हे माहीत नाही हे कोणाचे तरी कारस्थान असावे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, आक्षेप ज्यांनी घेतला त्यांना माहिती कोठून मिळाली हे सांगावे, असेही त्या म्हणाल्या. कालपासून मी जिल्ह्यात सभा घेतल्या. या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. विरोधी उमेदवारांच्या प्रवृत्ती माहीत आहेत, मतदार योग्य निर्णय घेतील. राज्यात महायुती गोपीनाथराव मुंडे यांची संकल्पना होती, जे सोबत आहेत त्यांच्या सहकाऱ्याने आम्ही पुढे जात आहोत, असेही त्या म्हणाल्या. ऊस तोड कामगाराची आता नोंद होत आहे, भविष्यात ऊसतोड कामगारांना न्याय देता येणार आहे. बीड जिल्ह्यात यंदा दुष्काळ आहे, दुष्काळात लोक स्थलांतर करत असतात, ऊस तोड कामगारांचे जीवन बदलण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधक दिशाभूल करत आहेत. ऊस तोड महामंडळ रद्द झाले नाही, पुढची पिढी ऊस तोडायला जाणार नाही. भाजपाची लढत आता अफवा सोबतच, अपवृत्ती सोबत आहे, वाईट विचारधारेसोबत आहे असे त्यांनी म्हटले. या वेळी भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे, सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, पप्पू कागदे, रमेश पोकळे, आदी उपस्थित होते.


























































