तत्काळ अहवाल सादर करा! महिला आयोगाच्या चाकणकर यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे. उर्फी जावेदने केलेल्या तक्रारीसंदर्भात हे पत्र असून या प्रकरणी तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. उर्फी जावेद हिने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली होती. यावेळी तिने भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

उर्फी जावेदने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, उर्फी जावेद या सिनेक्षेत्राशी संबंधित असुन अनेक वर्षापासून फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. त्यांचं राहणीमान आणि दिसणं त्यांना व्यावसायिकदृष्टया आवश्यक आहे. असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करुन श्रीमती चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायदयाकरिता किंवा वैयक्तिक प्रसिध्दीकरिता अर्जदार यांना मारहाण करण्याच्या धमक्या प्रसार माध्यमांवरुन जाहिरपणे दिल्या आहेत. श्रीमती चित्रा वाघ राजकीय व्यक्तित्व असल्याने त्या किंवा त्यांचा प्रभाव असलेली व्यक्ती अथवा व्यक्ती समुहाकडून अर्जदार यांच्यावर हल्ला होवू शकतो. त्यामुळे अर्जदार यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. श्रीमती चित्रा वाघ यांनी दिलेल्या धमक्यांमुळे अर्जदार यांना घराबाहेर पडतानाही भिती वाटत आहे. तसेच त्यांच्यासाठी असुरक्षित वातावरण निर्माण होवून त्यांना मुक्तपणे वावरता येत नाही, म्हणून प्रकरणाची दाहकता निवळेपर्यंत सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी अर्जदार यांनी केली आहे.

स्वच्छंद आणि मुक्त संचाराचा हक्क राज्य घटनेने प्रत्येक भारतीयाला दिलेला आहे. पुरोगामी विचारांच्या महाष्ट्राच्या राजधानी मुंबईत एका महिलेला असुरक्षित वाटणे, ही गंभीर बाब आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. सबब श्रीमती उर्फी जावेद यांचा अर्जाबाबत तात्काळ कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार अहवाल तात्काळ सादर करावा.